न्युझीलंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धा – 2023 भारताचा श्रीलंकेवर विजय, युएई कडून न्यूझीलंड मास्टर्सचा धुव्वा

फलटण टुडे (क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर ) : –

बेंगलोर, 5 मे (क्री. प्र.) आज झालेल्या समान्यामध्ये खुल्या गटात भरताने श्रीलंकेवर 74-43 असा 31 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. सात पैकी 6 गुण मिळवत भारताने गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. या सामन्यातभारताच्या एरिसने अष्टपैलू खेळ करताना 16 धावा करताना 4 वेळा श्रीलंकन खेळाडूंना बाद करण्यात यश मिळवले, दैविक (15 धावा व 2 बळी), धनुश (15 धावा) व सूरज (4 धावा व 3 बळी) यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर मोठा विजय साजरा केला. श्रीलंकेच्या शेवोन फोनेस्क (11 धावा व 3 बळी), कोलिथा (20 धावा व 1 बळी) व रूमन परेरा (12 धावा) यांनाच चांगली कामगिरी करता आली. भारताच्या धनुश व दैविक या पहिल्या जोडीने 4 षटकात 31 धावा केल्या, विजय व अफरोज या दुसर्‍या जोडीने 21 धावा केल्या. भारताच्या नमशिद व गिरीश या तिसर्‍या जोडीने निराशजनक कामगिरी केल्याने फक्त 2 धावाच धाव फलकावर लागल्या त्यानंतर सूरज व एरिस या चौथ्या जोडीने 20 धावा करत 74 धावा फलकावर लावण्यात यश मिळवल. तर श्रीलंकेच्या शेवोन फोनेस्क व एंडी सायमन या पहिल्या जोडीला 11 धावा करता आल्या (भारतीयांना तीनवेळा या खेळाडूंना बाद केले), रूमन परेरा व कमाल कुरुप्पू या दुसर्‍या जोडीला 21 धावा करता आल्या, चामिंडा व ईसुरू या जोडीने वजा 17 धावा केल्या (या जोडी वेळी भारतीयांनी 6 वेळा फलंदाजांना बाद केले (प्रत्येक बाद वजा 5 धावा)) तर शेवटच्या कोलिथा व दिलसारा या जोडीने जोरदार  फलंदाजी करत 28 धावा चोपून काढल्या. या सामन्यात भारताने विजयाचे 3 व चारपैकी तीन जोडीचे (जास्त धावा) 3 असे 7 पैकी 6 गुण वसूल केले तर शेवटच्या जोडीच्या धावफरकचा 1 गुण श्रीलंकेने मिळवला. इनडोअर क्रिकेट मध्ये प्रत्येक जोडीला 4 षटके फलंदाजी करावी लागते तर प्रत्येक खेळाडूला (विकेट कीपर सहित) 2 षटके गोलंदाजी करावी लागते.

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशनंने (IISF) बेंगलोर मध्ये न्यूझीलंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन XLR8 इनडोअर स्पोर्ट्स एरिना, बेंगळुरू, कर्नाटक येथे सुरू आहे. या स्पर्धेत यजमानं इंडियासह, न्यूझीलंड, श्रीलंका, युएई व सिंगापूर हे देश सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत खुला गट व मास्टर्स (४०+) गटाचे संघ सहभागी झाले आहेत.

मास्टर्स (40+) गटात युएईने अनुभवी न्युझीलंडवर 121-88 असा 33 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्युझीलंडकडून गाय कोलेमन (14 धावा), ड्रेव होल्मस (14 धावा), लॉरेंस वॉटसन (17 धावा, 1 बळी) यांनी केलेल्या कामगिरीला इतरांकडून साथ न मिळाल्याने मोठ्या परभवाला सामोरे जावे लागले. तर युएईच्या खालिद हुसैन (17 धावा व 2 बळी), मीत दलाल (26 धावा, 1 बळी), थरिंदू मेंडेस (26 धावा) व राजेश जी. (18 धावा 1 विकेट) यांनी केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर युएईने न्युझीलंडला धोबीपछाड दिली. 

इतर खुल्या गटाच्या सामन्यामध्ये न्युझीलंडने सिंगापूरचा 150-(-3) असा धुव्वा उडवला. युएईने भारत डेव्हलपमेंटवर 131-17 असा मोठा पराभव केला. न्युझीलंडने युएईचा 110-66 असा पराभव केला. सिंगापूरने भारत डेव्हलपमेंटवर 111-62 विजय मिळवला. श्रीलंकेने भारत डेव्हलपमेंटचा 94-(-9) असा पराभव केला व शेवटच्या सामन्यात न्युझीलंडने भारतावर 77-71 असा पुन्हा एकदा पराभव लादला.

मास्टर्स गटाच्या इतर सामन्यात भारताने भारत डेव्हलपमेंटचा 120-24 असा पराभव केला. न्युझीलंडने भारतावर 92-60 असा विजय मिळवला. तर युएईने भारत डेव्हलपमेंटवर 104-53 असा विजय साजरा केला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!