पालखी मार्गावर साक्षरतेचा जागर

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि २८ जून २०२५):-
संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या साक्षरता रथाचे गुरुवारी बारामती येथे आगमन झाले. बारामती येथे विविध शाळांमधून साक्षरता रथासह रॅली काढण्यात आली. दुपारी तीन पासून उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या राज्य अग्रदूत सुशीला व रुचिता क्षीरसागर या अजीनातीच्या उपस्थितीत साक्षरता गीते व विविध घोषणांच्या निनादात वारकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले.
मागील वर्षीपासून संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत उल्लास साक्षरता वारी आयोजित करण्यात येत आहे. देहू पंढरपूर मार्गावर पालखी सोहळ्यासोबत गावोगावी ग्रामस्थ व वारकऱ्यांचे प्रबोधन करून साक्षरतेचा जागर करण्यात येत आहे. यासाठी राज्य योजना संचालनालयाने एका व्हॅनसह तीन स्वयंसेवक शिक्षकांचे पथक रवाना केले आहे. साक्षरता विषयक गीते, घोषणा, घडीपत्रिका वाटप, पथनाट्य आदी उपक्रमांद्वारे साक्षरतेच्या प्रवाहात येण्यासाठी असाक्षरांना आवाहन करण्यात येत आहे.

राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेल्या बारामती येथील सुशीला क्षीरसागर (वय ७५) व त्यांची नात रुचिता क्षीरसागर(विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इ.पाचवी) यांच्या प्रेरक छायाचित्राची केंद्र शासनाने दखल घेतली होती. तसेच रुचिता गीतामधून साक्षरतेचा प्रचार करत आहे. राज्य शासन व योजना संचालनालयाने या दोघींना साक्षरता अग्रदूत म्हणून मागील वर्षी गौरविले आहे.

बारामती येथे शाहू हायस्कूल समोर पालखी मार्गावर साक्षरता वारी पथकाने साक्षरता गीते, भक्ती गीते आणि घोषणांनी पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्यांचे स्वागत केले. साक्षरता रथाचे स्वागत शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर, बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी संजय जाधव, विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर, नीलिमा मेमाणे, केंद्रप्रमुख रवींद्र तावरे, विठ्ठल जोरी, मुख्याध्यापक गणपत तावरे यांनी केले.

बारामती येथील कला पथकाने अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विविध शाळांमधील बालकलाकार संतांची वेशभूषा परिधान करून लक्ष वेधून घेत होते. गेले सांगून ज्ञानातुका, झाला उशीर तरीही शिका! होईल साक्षर जनसारा, हाच आमचा राहील नारा! यासारखे फलक लक्ष वेधून घेत होते. उल्लास उपरणे आणि उल्लास नवभारत साक्षरता टी-शर्ट परिधान केलेले स्वयंसेवक वारकऱ्यांना आपलेसे करून घेत होते. अनेकांनी वारकऱ्यांबरोबर फुगडीचा आनंद घेतला.
शरद रसाळ, नवनाथ गायकवाड, दत्तात्रय पांढरे, अशोक लडकत, रमेश चव्हाण, मनोहर कांबळे, रेवन्नाथ परकाळे, रवींद्र गडकर, सुहास आटोळे, रमेश कवितके, गुलाब आवळे, सागर गायकवाड, मनीषा जराड, रुपाली गायकवाड, पांडुरंग पाडोळे, सोमनाथ गोरे या स्वयंसेवक कलाकारांनी बहारदार कार्यक्रम घडवून आणला.
शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर, एम ई एस हायस्कूल, बारामती चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, मिशन हायस्कूल, राधेश्याम अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, डी ए सातव हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थी- शिक्षकांनी वारकऱ्यांचे स्वागत व प्रबोधन केले. साक्षरता रथासमवेत गणेश भगत, पोकळे, जगे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

