श्रीजगन्नाथ रथयात्रा भक्ती, सौंदर्य, आणि सांस्कृतिक एकतेचा भव्य सोहळा: अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इस्कॉन मंदिर व्यवस्थापन यांच्या वतीने सत्कार करताना मान्यवर


फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १ जुलै २०२५):-
भगवंतांच्या प्रेमाने आणि हरिनामाच्या गजराने भारलेल्या रस्त्यांवरून इस्कॉन बारामती यांच्या वतीने श्रीजगन्नाथ रथयात्रा चे आयोजन म्हणजे भक्ती, सौंदर्य, आणि सांस्कृतिक एकतेचा भव्य सोहळा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रविवार २९ जून रोजी बारामती येथील इस्कॉन मंदिर यांच्यावतीने पेन्सिल चौक व विद्या प्रतिष्ठान परिसरात भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित दादा बोलत होते .
या प्रसंगी श्रीमान नंददुलाल प्रभुजी, इतर मंदिर व्यवस्थापक, भक्त आणि बारामतीकर नागरिक उपस्तीत होते.
भगवान रथावर, भक्त सुशोभित रस्त्यावर – प्रेमाच्या दोरीने जोडलेले अशा विहंगम दृश्याची प्रचिती आली.
फुलांनी आणि पारंपरिक सजावटीने झळाळलेला रथ, त्यावर विराजमान श्रीजगन्नाथ, बलदेव व सुभद्राजी – आणि हातात दोरी घेऊन त्यांच्या कृपेला पात्र होण्यासाठी आगंतूक होऊन धावणारे भक्त. हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासारखे होते. रथयात्रा पेन्सिल चौक → सिटी इन चौक → सहयोग सोसायटी → महानगर बँक मार्गे त्रिमूर्ती नगरमधील इस्कॉन मंदिरात विसावली. यात्रेची वैशिष्ट्ये म्हणजे आकर्षक वेशभूषा व पारंपरिक नृत्य, अखंड हरिनाम संकीर्तन व मंत्रजप, अध्यात्मिक पुस्तकांचे वितरण, प्रसाद सेवा आणि शांतीचा संदेश आणि श्री नंददुलाल प्रभुजींचे प्रेरणादायी मार्गदर्शन.
“रथ ओढणे म्हणजे दोरी ओढणे नाही, तर भक्तीची नाळ भगवंताशी जोडणे होय,” असे सांगत श्रीमान नंददुलाल प्रभुजींनी सहभागी भाविकांचे आभार मानले.
हजारो भक्तांनी सहभाग घेऊन आपल्या जीवनात श्रीकृष्णप्रेमाचे अशा रीतीने बीज पेरले. रथ फक्त पुढे मार्गस्थ झाला नाही तर तो हृदयातही उतरला! बालक, युवक, माता, वयोवृद्ध – सर्व वयोगटांतील भक्तांनी यात सहभाग घेत, एकजुटीचा आणि आध्यात्मिकतेचा मंत्र पुन्हा एकदा शहराला ऐकवला. प्रत्येक वळणावर संकीर्तनाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि भक्तीच्या रंगात रंगलेली बारामती – ही केवळ यात्रा नव्हे, तर एक अनुभव होता असे डॉ अपर्णा काटे यांनी सांगितले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!