
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. ७ जुलै २०२५): राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले फ़ुलशेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान,काढणीपश्चात प्रशिक्षण, हरितगृहातील आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र बाजारात कृत्रिम फुले येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासह पर्यावरण विभागासोबत अधिवेशनकाळातच बैठक घेऊन यावर नियंत्रणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही श्री. गोगावले यांनी यावेळी सांगितले.
सदस्य कैलास पाटील(घाडगे), नारायण कुचे यांनी या लक्षवेधीमध्ये सहभाग घेतला.