शेती आणि शेतकर्‍यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी तांत्रिक शेतीद्वारे एकरी उत्पादन वाढ आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी आवश्यक : अरविंद मेहता


फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. ०९ जुलै २०२५): शेती आणि शेतकर्‍यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी पारंपारिक शेती पद्धती सोडून नवीन तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित आधुनिक शेती औजारे, साधने सुविधा यांचा वापर करुन तांत्रिक शेतीद्वारे एकरी उत्पादन वाढीची आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अरविंद मेहता यांनी केले.
जैन सोशल ग्रुप फलटण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय, कृषी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त सहभागाने मालोजीराजे शेती संकुलातील सभागृहात कृषी पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांचा सन्मान आणि कृषी दिन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरुन अरविंद मेहता बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य रणजित निंबाळकर, प्रगतशील शेतकरी रामदास कदम, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, राजेंद्र कोठारी, विशाल शहा यांच्यासह कृषी सन्मान पुरस्कार प्राप्त शेतकरी त्यांचे कुटुंबीय, महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी आणि शेतकरी उपस्थित होते.


स्वातंत्र्यपूर्वकाळात देशाची लोकसंख्या ४० कोटी होती, स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात एक कोटी २० लाख झाली असताना शेतीक्षेत्र, औद्योगिक विकास, घरबांधणी, रस्ते, शासकीय इमारती, शाळा महाविद्यालयांच्या इमारती, क्रीडांगणे यासाठी आरक्षित करुन वापरल्याने प्रत्यक्ष उत्पादन घेतले जाणारे शेतीक्षेत्र घटले आहे, तथापि वीज, पाणी, सुधारित शेती तंत्रज्ञान याद्वारे शेतीचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असल्याने आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असला तरी पुरेसे एकरी उत्पादन मिळत नसल्याने उत्पादित शेतमालाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आणि उत्पादन खर्च याचा मेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, त्यासाठी आता आधुनिक शेती तंत्रज्ञानाद्वारे अधिक उत्पादन देणारे बियाणे, योग्य खतमात्रा, आवश्यक तेवढेच पाणी या सर्व गोष्टींचा सुधारित तांत्रिक शेतीद्वारे विचार करुन फायद्याची शेती करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे अरविंद मेहता यांनी स्पष्ट केले.
या गोष्टी शेतकर्‍यांना समजत नाहीत असे नाही, नव्या पिढीतील शेतकरी आता पदवीधर, द्विपदवीधर आहे, त्यामुळे त्याला या नव्या शेती तंत्रज्ञानाची माहिती आहे, मात्र उत्पादित शेतमालाची विक्री व्यवस्था योग्य पद्धतीची नसल्याने उत्पादित शेतमाल कवडी मोलाने विकला जातो ही खरी समस्या असल्याने त्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता असून शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि त्या मालाला योग्य बाजार पेठ अशा पद्धतीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी व्यापारी, शेतकरी यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता अरविंद मेहता यांनी सर्वांसमोर मांडली.
फलटण तालुक्यात किमान १ हजार शेतकरी रेसिड्यू फ्री शेती उत्पादन घेणारे असावेत या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आपल्या शेतमालाला पाठवायचे असेल तर त्यांचे नियम व निकष पाळावे लागतात, त्यासाठीच रिसीड्यू फ्री उत्पादन घेण्यावर शेतकर्‍यांनी भर द्यावा म्हणजे त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड यांनी केले.
आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पादन घेतो पण उत्पादनाचे उत्पन्नामध्ये रुपांतर करण्यात आपण कमी पडत असल्याचे सांगून गायकवाड पुढे म्हणाले, आपल्याकडे आपल्या उत्पादनाचे मार्केटींग करण्याचे तंत्रज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले नाही, तसेच आपल्या येथे पायाभूत सुविधांचीही कमतरता आहे, दर्जेदार नर्सरीही कमी प्रमाणात आहेत. सध्या शेतकरी शेती पिकवतो ते फक्त खतांच्या जोरावर, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतल्यास आपल्या शेती उत्पादनामध्ये व तयार होणार्‍या उत्पादनाच्या दर्जामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते याची ग्वाही तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी यावेळी दिली.
शेतकर्‍याने शेतामध्ये काम करीत असताना त्याने कोणत्या पद्धतीने पिक घेतले, औषधे कधी वापरली याची दैनंदिनी ठेवल्यास स्वतःबरोबरच इतर शेतकर्‍यांनाही त्याचा चांगल्या प्रकारे फायदा नक्कीच होईल.
चांगले व दर्जेदार उत्पादन घ्यावयाचे असेल तर रेसीड्यू फ्री साठी काम करावे लागणार असल्याचे स्पष्ट करीत गायकवाड पुढे म्हणाले, यासाठी आम्ही धुमाळवाडी पासून सुरुवात केली आहे. यामध्ये शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना कीटक नाशक फवारण्याचा कालावधी, त्याच्यामध्ये किती दिवसाचे अंतर असावे, कीटक नाशक किती प्रमाणात फवारावे, खतांची मात्र कशी असावी याची माहिती देण्यात येत आहे. भरमसाठ कीटक नाशक फवारुन उपयोग होत नाही, योग्य प्रमाणात व योग्य वेळी कीटक नाशक फवारले तरच उत्पादनात वाढ होऊन उत्पादन दर्जेदार तयार होते व त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी केले.
शेती मालाच्या योग्य विपननासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी निर्माण करावी, त्यातून त्यांना योग्य बाजारपेठ मिळेल व शेतमालाला योग्य मोबदलाही मिळेल असा विश्वास तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी गोविंद फाऊंडेशनचे व्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड, प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषीतज्ञ रामदास कदम, सौ. शालन भोईटे, सौ. शोभा भाईटे यांची समयोचित भाषणे झाली.
जैन सोशल ग्रुपच्यावतीने कृषी व दुग्धोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व राष्ट्रीय, जिल्हास्तर व तालुकास्तरावर पुरस्कार मिळालेल्या सचिन साधु सांगळे, रामदास भुजंगराव कदम, जनार्दन संतराम अडसुळ, रामचंद्र बाबुराव सावंत, सौ. शालन बळवंत भोईटे, सौ. शोभा दत्तात्रय भाईटे, बबन रामचंद्र मुळीक, महेश देवराव धुमाळ, सौ. मनिषा संदिप पवार, सौ. स्वाती विजयकुमार पवार या शेतकरी बांधव व भगिनींचा शाल, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
प्रारंभी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कृषी दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करुन जैन सोशल ग्रुप करीत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.
जैन सोशल ग्रुप इव्हेंट चेअरपर्सन व निवृत्त कृषी अधिकारी तुषार शहा यांनी जैन सोशल ग्रुप व शेतकरी यांच्या कामकाज व त्यांचे परस्पर संबंध याविषयी विवेचन केले. श्रेयांश जैन व प्राजक्ता जाधव यांनी उत्तम सुत्रसंचालन केले व आभार मानले.श्रेयांश जैन यांनी कार्यक्रमाचे ऊत्तम नियोजन केले होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!