
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०९ जुलै २०२५):-कृषी महाविद्यालय, फलटण येथील बी. एस. सी. कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत PROM (Phosphorus rich organic manure) खत निर्मिती तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये PROM खत उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा आराखडा तयार करणे, त्यातील विविध मूलद्रव्याचे प्रमाण, खत तयार करण्यासाठी लागणारी सामग्री व मशिनरी, खत तयार करण्याची पद्धत व लागणारे पॅकिंग मटेरियल या सर्व गोष्टींची माहिती दिली जाते. तसेच PROM खताचे फायदे आणि सेंद्रिय शेतीचे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जाते. PROM खत निर्मिती सोबतच प्रकल्पातील व्यवस्थापन व जमा खर्च ताळेबंद, खत तयार करत असताना येणाऱ्या अडचणी व त्याचे निराकरण करणे अशा विविध बाबींवर माहिती देऊन त्यामार्फत खत तयार करून घेतली जाते अशा प्रकारे PROM प्रकल्पाची परिपूर्ण व्यावसायिक तंत्रज्ञान व मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांना स्वतःचे कृषी उद्योग उभे करण्यासाठी प्रेरणा दिली जाते. फलटण तालुक्यातील युवकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन कृषी क्षेत्रातील उद्योजकता विकसित करण्याची एक संधी म्हणून पहावी हा यामागील उद्देश आहे. सदरील प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. आर. ससाने, प्रा. जी. एस. शिंदे, मृदा शास्त्र विभाग, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
(शब्द संकलन : डॉ. जी. बी. अडसूळ, सहाय्यक प्राध्यापक, कृषी विस्तार विभाग)