महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण..!

फलटण टुडे वृत्तसेवा ( मुंबई दि १३ जुलै २०२५):- महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसंच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत झाला, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार मावळ्यांना संघटीत करुन महाराष्ट्राच्या मातीत रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. रयतेचं राज्य स्थापन करण्याचा ध्यास घेऊन लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना याच किल्ल्यांनी भक्कम साथ दिली होती. महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पाहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचे विचार, मराठी मावळ्यांचा पराक्रम जगभरात पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजतील. ऐतिहासिक वारशाचा गौरव लाभलेल्या या बारा किल्ल्यांसह राज्यातील सर्वच किल्यांचं संरक्षण, संवर्धन करण्यासह त्यांचं महत्व, तिथे घडलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.

शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे केवळ दगड धोंड्यांचं बांधकाम नाही, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे भक्कम बुरुज आहेत. आज त्यांना जागतिक दर्जा मिळाल्यानं स्वराज्याच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्यातील दुर्ग दुर्गेश्वर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी हे ११ किल्ले शिवकालीन सामरिक रणनीती, अद्वितीय स्थापत्य कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहेत.

युनेस्कोकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा सन्मान नाही, तर ती पर्यटन, स्थानिक रोजगार, संशोधन आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. महाराष्ट्रातील गडकोटांभोवती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी नवीन अर्थव्यवस्था निर्माण होण्याची दिशा या निर्णयामुळे निश्चित झाली आहे.

शिवकालीन गडकोटांना युनेस्कोकडून मिळालेली मान्यता ही आपल्या संस्कृतीचा, स्वराज्य संकल्पनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जागतिक स्वीकार आहे. हे महाराष्ट्रासाठी एक तेजस्वी पर्व आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेली ही दुर्गशक्ती आता जागतिक मंचावर मानानं झळकणार.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!