बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दिलेल्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करणार – संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि १६ जुलै २०२५):-
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने अनेक महत्त्वाचे प्रस्ताव दिले असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली. बारामती एमआयडीसी सह इंदापूर दौंड पुरंदर. शिरूर परिसरातील उद्योग प्रतिनिधींची बैठक बर्हाणपूर पोलीस उप मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड ,पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आधी प्रमुख अधिकाऱ्यांनी या बैठकीस मार्गदर्शन केले.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार , कार्यकारणी सदस्य संभाजी माने , हरिश्चंद्र खाडे , उद्योजक राजाराम सातपुते, राजेंद्र पवार, अविनाश सावंत, अरुण म्हसवडे ,विवेक सातपुते, शिवराज जामदार, रियल डेअरीचे मनोज तुपे, पियाजोचे चंद्रकांत काळे , किर्लोस्करचे विशाल शिंदे, डायनामिक्सचे मुकेश चव्हाण यांनी या बैठकीत सहभागी होऊन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडले.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दिलेल्या प्रस्तावांमध्ये एमआयडीसी मध्ये नवीन पार्किंग झोन तयार करणे, पेन्सिल चौकात सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे , एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यांवर आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर्स, रंबलर्स ,ब्लिंकर्स बसवणे, एमआयडीसी फेज टू व विमानतळाच्या परिसरात पोलीस चौकी उभारणे, चोऱ्यांना आळा घालणे, भंगारवाल्यांची अद्यावत नोंद ठेवणे, सीसीटीव्हीची व्याप्ती वाढवणे , कामगारांची पोलीस पडताळणी प्रभावीपणे करणे, महिला कामगारांच्या सुरक्षतेसाठी विशेष बंदोबस्त ठेवणे , जागोजागी सूचनापेटी बसवणे, बारामती एमआयडीसी क्षेत्रात पोलीस गस्त वाढवणे , पेन्सिल चौक ते गदिमा दुतर्फा रस्त्यावर दोन व चार चाकी वाहनांचे स्वतंत्र पार्किंग करणे, पोलीस ठाण्यात उद्योग संवाद कक्ष सुरू करणे अशा महत्त्वाच्या सूचना बैठकीत केल्या असल्याचे बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले.

खंडणी सारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलीस विभाग प्राधान्य देत असून उद्योगांनी निर्भयपणे पुढे येऊन गुन्हे नोंदवावेत ,त्यातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींना दिले.

बैठकीनंतर पोलीस विभागाला आषाढी वारी निमित्त विशेष सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व कंपन्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!