
फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे दि १८ जुलै २०२५):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे गुंजवणी जलसिंचन प्रकल्प, ता. राजगड, जि. पुणे संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील गुंजवणी जलसिंचन प्रकल्पामुळे परिसरातील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामास गती देऊन हे काम येत्या 2 वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
गुंजवणी जलसिंचन प्रकल्पासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या प्रकल्पाच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीने 20 दिवसांत छाननी करून पाठवावा. या प्रकल्पाच्या माध्यमातून 16 गावांना समान पाणी वाटप होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विजय शिवतारे व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.