
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १९ जुलै २०२५):- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील बी.एस.सी. कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग कौशल्य विकास विभाग, सातारा अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राद्वारे शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) स्किल क्रेडिट पॉईंट करण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत कृषि महाविद्यालय, फलटण येथे ऑगस्ट 2024 पासून “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK)” स्थापन करण्यात आले आहे. केंद्रांतर्गत शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण वर्गामध्ये 30 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शेळी आणि मेंढी पालन आधारभूत माहिती - शेळी व मेंढीच्या जाती, आहार, निवारा, आरोग्य व्यवस्थापन आणि प्रजनन याबद्दल माहिती,
व्यवसाय व्यवस्थापन – शेती योजना, आर्थिक व्यवस्थापन, आणि विपणन धोरणे, आरोग्य व्यवस्थापन – शेळी व मेंढीचे लसीकरण, रोग नियंत्रण आणि प्रथमोपचार, प्रजनन व्यवस्थापन
योग्य जोडीदार निवड, गर्भधारणा आणि प्रसूती व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जसे की सिंचन, चारा व्यवस्थापन आणि यांत्रिकीकरण, शास्त्रीय शेळी व मेंढी पालनासाठी लागणारे परवाने, जमा खर्च व ताळेबंद, शेळी मेंढी पालन व्यवसायासाठी येणाऱ्या विविध अडचणी व त्यांचे निराकरण करणे, शेळी मेंढी पालन केंद्रांना भेटी आयोजित करणे अशा प्रकारे शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रात्यक्षिकाद्वारे राबवण्यात येत आहे. शेळी व मेंढी पालन या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना व्यावसायिक तांत्रिक मार्गदर्शन देऊन भविष्यात स्वावलंबी कृषी उद्योजक व्हावे हा यामागील हेतू आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व उद्योजकता विकास विभागातर्फे मोफत राबविण्यात येत आहे. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षक प्रा. स्वप्निल लाळगे, नोडल अधिकारी डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
(शब्द संकलन : डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)