पुण्यात ऐतिहासिक आंदोलन

फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे दि १२ ऑगस्ट २०२५):- नागपूर विभागातील शालार्थ प्रकरणी काही शिक्षण अधिकाऱ्यांना विना चौकशी अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ, अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाचे सामूहिक रजा आंदोलन आज पुण्यात अधिक तीव्र झाले. राज्यभरातील विविध स्तरांवरील सुमारे 400 शिक्षण अधिकारी, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आज शिक्षण आयुक्तालय, पुणे येथे जमले.
हे आंदोलन 8 ऑगस्टपासून सुरू असून, आज मोठ्या संख्येने राज्यभरातून अधिकारी पुण्यात दाखल झाल्याने त्याला व्यापकता प्राप्त झाली. संघटनेने 1 ऑगस्ट रोजी एक दिवसाची रजा घेऊन शासनाकडे निवेदन दिले होते. मात्र, शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन दीर्घकाळ चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शिक्षण विभागाच्या प्राथमिक,माध्यमिक, योजना संचालनालयांमधील आणि विभाग, जिल्हा, तालुका स्तरीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागातील दैनंदिन प्रशासनावर परिणाम झाला आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
- विना चौकशी अटक टाळावी आणि शिक्षण विभागाच्या परवानगीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करू नये.
- शालार्थ संबंधित सर्व प्रकरणे 7 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करावीत.
- मागण्या मान्य होईपर्यंत सामूहिक रजा आंदोलन सुरू ठेवणे, तसेच शिक्षण अधिकारी किंवा वेतन पथक अधीक्षक यांनी वेतन बिले स्वाक्षरी न करण्याचा निर्णय.
आंदोलनाला विविध शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना तसेच काही लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा मिळाला आहे. आंदोलनात स्वतः शिक्षण संचालकांचाही सहभाग आहे, ही बाब विशेष महत्त्वाची ठरली.
संघटनेचे अध्यक्ष शेषराव बडे यांनी स्पष्ट केले की, “न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.” दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि प्रधान सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्यासोबत मंगळवारी मुंबईत चर्चा होणार असून, त्यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
पुण्यातील आजच्या आंदोलनादरम्यान ‘बंद करा बेकायदेशीर विना चौकशी अटक सत्र’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

महत्त्वाचेए मुद्दे
नागपूर शालार्थ प्रकरणी विना चौकशी अटक विरोधात राज्यव्यापी आंदोलन.
8 ऑगस्टपासून सुरू; 11 ऑगस्ट रोजी पुण्यात 400 पेक्षा अधिक अधिकारी सहभागी.
विविध शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा.
प्रमुख मागण्या: विना चौकशी अटक थांबवणे, SIT मार्फत चौकशी, वेतन बिले रोखणे.
शिक्षण संचालकांचाही प्रत्यक्ष सहभाग.
राज्यभरातील शिक्षण विभागाचे कामकाज ठप्प.
उद्या शिक्षण मंत्र्यांसोबत मुंबईत चर्चा होणार.
महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेत प्रथमच, विद्येच्या माहेरघरात अभूतपूर्व आंदोलनाचा साक्षीदार बनले शिक्षणविश्व व मध्यवर्ती इमारत. आजपर्यंत न झालेली वेळ अखेर आली; शिक्षण-प्रशासकांच्या मनातील वेदना आणि प्रश्न मांडणारा हा ऐतिहासिक क्षण, राज्याच्या शैक्षणिक प्रवासातील एक गंभीर वळण ठरतो आहे.शिक्षणाच्या पवित्र मंदिरात भीतीचे वातावरण. जर आज शिक्षण अधिकारीच सुरक्षित नसतील, तर उद्याच्या महाराष्ट्राला कोण मार्गदर्शन करणार?