“इस्कॉन भारताच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवाचे विश्वदूत”: श्रीमान गोरांगदास

फलटण टुडे वृत्तसेवा (‘बारामती दि २९ ऑगस्ट २०२५):-
निराशा जनक परिस्थितीला आपण संकल्प शक्ती, इच्छाशक्ती, विवेक शक्ती आणि साधना शक्ती या जोरावर आशेचा किरण या संधीमध्ये परिवर्तित करू शकतो आणि पारमार्थिक विकास घडवू शकतो’, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, इस्कॉनचे जीबीसी सदस्य, श्रीमान गोरांगदास (बी. टेक.आय.आय.टी. मुंबई)यांनी दिले. इस्कॉन बारामतीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव २०२५’ सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले.
‘ आपण जोपर्यंत कर्तव्य करीत नाहीत तोपर्यंत भगवंत प्रकट होत नाहीत. आपण आपल्या जीवनात स्नेह, भाव आणि अनुरागाचा संबंध भगवंतांशी प्रस्थापित करू शकतो’, हा गीतेचा संदेश त्यांनी दिला. भगवद्गीतेच्या श्रवणातून व शास्त्राचाअभ्यास करून दृष्टिकोन बदलण्याची क्षमता विकसित करून भौतिक जगातील भोगविलासातून मुक्त होऊन भगवंतांच्या सेवेत जोडण्याचा मूलमंत्र त्यांनी आपल्या प्रवचनातून दिला. सत्संगामुळे उचित आणि अनुचित अनुसंधान करून
वास्तविक सार्थ काय आहे हे जाणून घेऊन आपण जीवनाचे कल्याण साधू शकतो, असे मौलिक विचार सांगितले. साधूकृपा आणि हरिनामाशिवाय भगवंतांप्रति प्रेम शक्य नाही असा मूलभूत संदेश त्यांनी दिला. कुठल्याही विपरीत परिस्थितीत निराश न होण्याची आणि उत्साह, निश्चय, ध्येय आणि प्रयत्न टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित तरुणाईला उद्देशून केले.
श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी सर्वांना ‘ प्रवास आत्मशोधाचा’ या गीता कोर्सच्या प्रशिक्षण वर्ग नोंदणीसाठी आवाहन देखील केले.
बारामतीतील सावंत विश्व- कृष्णाई लॉन्सच्या प्रांगणात या भव्य आणि दिव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तीपर्वाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वरूप श्रीमान कृपासिंधू प्रभू यांचे कीर्तन, श्रीश्री राधा गोविंदजी यांचा महाअभिषेक, ‘हरी सुंदर नंद मुकुंदा’ हे बालनृत्य, नाटिका- भक्ताधीन कृष्ण’, श्रीमान गोरांग प्रभुजी यांचे सुमधुर प्रवचन, महाआरती व महाप्रसाद असे होते.
२००३ सालापासून या कार्यक्रमाचे नित्यनेमाने दरवर्षी आयोजन केले जाते. याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी मा. श्रीयुत राजेंद्र दादा पवार, अध्यक्ष–कृषी विकास ट्रस्ट (ADT), बारामती, उद्योजक मा. श्री भारत गावडे पाटील, सावंत विश्वचे मा. श्री.ओम सावंत, मा. श्रीयुत हनुमंत येडे, मा. ॲड. नीलिमाताई गुजर, सचिव , विद्या प्रतिष्ठान, उद्योजक मा. श्री अर्जुन देसाई, संस्थापक, नेचर डिलाईट प्रायव्हेट लिमिटेड, बारामती उपविभागाचे प्रांताधिकारी मा. श्री वैभव नवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी इस्कॉन बारामतीचे श्रीमान नंददुलाल प्रभू, श्रीमान सुधीर चैतन्य प्रभू, उषामती माताजी आणि मंदिर व्यवस्थापन समिती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कृष्ण भक्तीचा हा दीप सर्वांच्या हृदयात प्रज्वलित ठेवण्यासाठी इस्कॉन बारामती नेहमीच प्रयत्नशील आणि कृतिशील असते असे दृकश्राव्य माध्यमातून पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलिमा पेंढारकर आणि डॉ. किशोर रुपनवर यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!