चव्हाणवाडी, साखरवाडी, पिंपळवाडी, व जिंती, बिबी, वाघोशी, झिरपवाडी येथील बांधव मुंबईला पाठवणार जेवण व पाणी

राज्य सरकार व मुंबई महापालिकेने मराठा समाजाची केली थट्टा, तुम्ही मते मागायला आल्यावर तुम्हाला पाण्याचा घोटही मिळणार नाही मराठा समाज राज्य सरकारवर चिडला,

मुंबई – चव्हाणवाडी मराठा बांधवांनी आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी आज जेवणाची सोय केली यावेळी उपस्थित मुंबई स्थित मराठा बांधव

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण प्रतिनिधी): – आपल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठे मुंबईकडे गेले असताना राज्य सरकार व मुंबई महापालिका यांच्याकडून त्या लाखो लोकांची गैरसोय व्हावी अशी वागणूक सुरू असताना त्या वागणुकीच्या विरोधात आता मराठ्यांनी राज्य सरकार व महापालिकेचा निषेध नोंदवला असून आपल्या या मराठा योद्धांना पाणी नाश्ता व जेवण पुरविण्यासाठी फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी, साखरवाडी पिंपळवाडी तसेच जिंती, बिबी वाघोशी झिरपवाडी व इतर गावातील मराठा बांधवांनी एकत्र येत भाकरी ठेचा भाजी व इतर सामग्री मुंबईला नेण्यासाठी पुढे आले असून आपल्या हजारो बांधवांना आझाद मैदानावर पोहोचविण्यासाठी सर्वच गावात लगबग सुरू झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या विचारावर मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संविधानिक मार्गाने आझाद मैदानावर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेला असताना तेथील राज्य सरकार व मुंबई महापालिकेने त्या लोकांना सुविधा न देता गैरसोई कशी होईल असा दुर्दैवी प्रयत्न केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज चिडला असून आता सरकारमधील नेते तसेच त्यांचे बगलबच्चे ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मते मागायला येतील तेव्हा त्यांना पाण्याचा घोट सुद्धा द्यायचा नाही असे ठरविले असून संविधानिक मार्गाने न्याय मागत असलेल्या लोकांना जाणून-बुजून त्रास देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने सुरू केला आहे त्याचा सर्वच मराठा बांधवांनी निषेध नोंदविला आहे.
दरम्यान आपल्या समाजातील लोकांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आज पासून दररोज अनेक गावातून मराठा बांधव व भगिनी हजारो भाकरी ठेचा व भाजी तयार करून मुंबई स्थित मराठा बांधवांच्या मदतीने आझाद मैदानावर जमलेल्या मराठा समाजातील लोकांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी पुढे सरसावला असून यामध्ये आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी आझाद मैदान व मुंबई महापालिका परिसरात तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मराठा बांधवांना चव्हाणवाडी येथील मराठा बांधवांनी अन्नदान उपलब्ध करून दिले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!