
बोलताना ताराचंद्र आवळे, व्यासपीठावर विजय शिंदे प्रवीण साळुंखे संतोष नाळे व मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (अलगुडेवाडी दि ०१ सप्टेंबर २०२५):-शिक्षण प्रक्रियेमध्ये सामील झाल्यामुळे भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांचे जीवनमान काही प्रमाणात उंचावलेले दिसते तर काही लोक आजही भटके जीवन जगत असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळेच समाज कल्याण विभागामार्फत अनेक योजना राबवून अनुसूचित जाती जमातीतील व भटक्या जाती जमातीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्यावर असलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यामुळेच आज भटक्या जाती जमातीतील लोक विविध पदावरती अधिकारी पदाधिकारी दिसून येतात. त्यांनी स्वावलंबनातून स्वाभिमानाकडे वाटचाल केलेली दिसते. हा सारा परिणाम शिक्षण व संस्काराचा असलेला दिसतो. तसेच वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे आपण चांगले रीडर बनला तर भविष्यात आपण लीडर बनाल असे मत प्रमुख वक्ते माणदेशी साहित्यिक, समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी पाच पांडव सेवा संघ संचलित पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अलगुडेवाडी ता. फलटण येथे 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक संतोष नाळे, मुख्याध्यापक विजय शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माळी आर. ए., ज्येष्ठ शिक्षक प्रवीण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की वाचाळवीर होण्यापेक्षा वाचनविर झाले तर निश्चितच जीवन बदलेल. महापुरुषांच्या त्यागातून निर्माण झालेला

स्वातंत्र्याचा आज आपण मनसोक्त आनंद घेत आहोत. त्यांचा त्याग व समर्पण आपल्यासाठी प्रेरणादायी आहे म्हणून प्रत्येकाने जबाबदारीने जीवन जगले पाहिजे. भटक्या जाती जमातीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे व मिळवून दिला पाहिजे यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे. भटक्या जाती जमातीचा इतिहास, त्यांच्यातील काही प्रेरक व्यक्तिमत्वे, तसेच काल आज उद्या काय परिस्थिती असेल यावर भाष्य केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर , क्रांतीबा ज्योतीबा फुले , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , राजर्षी छत्रपती शाहु महाराज , अण्णाभाऊ साठे, क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक प्रवीण साळुंखे यांनी केले आभार मधुकर देवकाते यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले. यावेळी विनोद शिंदे, माऊली वाघमोरे, राजेंद्र सोनवलकर, रोहिणी जाधव, संतोष गाढवे, राजू बनसोडे, भीमराव दुधे तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व संकुलातील सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

