साक्षरता सप्ताह विशेष : भारतातील डिजिटल युगातील साक्षरतेचा प्रवास!

राजेश क्षीरसागर,
शिक्षण सहसंचालक

फलटण टुडे वृत्तसेवा (विशेष लेख ):-जगभरात दरवर्षी ८ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर शिक्षण व साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जाणारा हा दिवस भारतासाठी विशेष आहे. कारण आपल्याकडे अजूनही अनेक भागात निरक्षरतेचे ओझे आहे. दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे डिजिटल साक्षरतेचे नवे आव्हान आहे. त्यामुळे आजची खरी गरज म्हणजे पारंपरिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता यांची सांगड घालणे आवश्यक आहे. जागतिक साक्षरता दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दि. १ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या साक्षरता सप्ताहाच्या निमित्ताने हा विशेष लेख.

येत्या ८ सप्टेंबर रोजी यंदाचा (सन २०२५) जागतिक साक्षरता साजरा केला जाणार आहे. या दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात दि. १ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत जागतिक साक्षरता सप्ताह साजरा केला जात आहे‌. यंदाच्या जागतिक साक्षरता दिनाची संकल्पना (थीम) “डिजिटल युगात साक्षरतेचा प्रसार – उल्लास कार्यक्रमाच्या माध्यमातून.” अशी आहे . उल्लास म्हणजे (अंडरस्टॅंडिंग लाईफलॉंग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी (Understanding Lifelong Learning for All in Society) होय. हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा प्रत्येक नागरिकाला आयुष्यभर शिकत राहण्याच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

सध्याच्या काळात साक्षरतेची व्याख्या ही केवळ अक्षर ओळखणे एवढी मर्यादित राहिलेली नाही. सध्याच्या काळात डिजिटल साक्षरतेशिवाय माणूस हा समाजात अपूर्णच राहत आहे. मोबाईलवरील संदेश वाचणे, संगणकावर माहिती शोधणे, इंटरनेटचा सुरक्षित वापर करणे, खऱ्या व खोट्या माहितीचा फरक ओळखणे, आर्थिक व्यवहार करताना सजग राहणे हे सारे गुण आजच्या काळातील खऱ्या साक्षरतेचे मापदंड झाले आहेत.कोरोना संसर्गाने ही गरज अधिक ठळक केली आहे. या कोरोना संसर्गाच्या काळात शाळा बंद झाल्या. मोबाईल व संगणक हेच शिक्षणाचे केंद्र झाले. त्यामुळे ज्यांच्याकडे साधने व इंटरनेट होते तेच पुढे गेले आणि बाकीच्यांच्या हातून शिक्षण सुटले.परिणामी डिजिटल दरी निर्माण झाली. या दरीमुळे ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे. ज्यांच्याकडे नाही अशा दोन गट पडले. यातूनच या दोन गटातील अंतर हे गंभीर समस्या म्हणून समोर आले. हाच अनुभव सांगतो की, उद्याचे समाज जीवन सुसंवादी, समानताधिष्ठित ठेवायचे असेल तर डिजिटल साक्षरता अनिवार्य आहे. भारतात डिजिटल साक्षरतेसाठी सध्या अनेक उपक्रम सुरू आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत (PMGDISHA) देशातील लाखो ग्रामस्थांना संगणक व मोबाईल वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे. यानुसार दीक्षा व स्वयं या दोन्ही व्यासपीठांवर हजारो अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन संस्थेने (NIOS) डिजिटल मार्कशीट्स, व्हर्च्युअल शाळा, दृष्टीहिनांसाठी बोलकी पुस्तके, तसेच मुक्त विद्या वाणी हे वेब-रेडिओ आदी विविध उपक्रम सुरू केले आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात इन्फ्लिबनेट व शोधगंगा यांनी संशोधकांना मोठे साहाय्य दिले आहे. राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय हा तर ज्ञानाचा खजिनाच ठरला आहे. या प्रयत्नांना अधिक व्यापक बनवण्यासाठी दरवर्षी दि. १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह साजरा केला जातो. जागतिक साक्षरता दिनाच्या पार्श्वभूमीवर हा आठवडा एक लोकचळवळ म्हणून देशभर पाळला जात आहे.

साक्षरता सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन

  • दि. १ सप्टेंबर २०२५ : घरोघरी जाऊन शिकणाऱ्यांची व स्वयंसेवक शिक्षकांची नोंदणी मोहीम.
  • दि. २ सप्टेंबर २०२५ : महाविद्यालये, तांत्रिक संस्था, विद्यापीठे, एनसीसी, एनएसएस व शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून विशेष नोंदणी मोहीम.
  • दि. ३ सप्टेंबर २०२५ : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा, परिसंवाद व जागरूकता सभांचे आयोजन.
  • दि. ४ सप्टेंबर २०२५ : ग्रामपंचायती, महिला गट, शेतकरी क्लब, स्वयंसेवी संस्था व निवृत्त कर्मचारी यांच्या सहभागातून गावोगावी जाणीव जागृती.
  • दि‌ ५ सप्टेंबर २०२५ : शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रभातफेरी, रॅली व नाटिका सादर करून संदेश.
  • दि. ६ सप्टेंबर २०२५ : भित्तिचित्र,पत्रके, फलक व पोस्टरद्वारे जनजागृती.
  • दि. ७ सप्टेंबर २०२५ : “शिक्षण सर्वांसाठी” या विषयावर वादविवाद व चर्चासत्रांचे आयोजन.
  • दि. ८ सप्टेंबर २०२५ : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी देशभर लघुपट, रेडिओ संदेश, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक सत्रांच्या माध्यमातून साक्षरतेचा उत्सव साजरा करणे.

हा संपूर्ण सप्ताह केवळ शासकीय उपक्रम नसतो तर, तो समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातून जिवंत होतो. घरोघर प्रचार करणारा स्वयंसेवक, रॅलीत सहभागी होणारे विद्यार्थी, पोस्टर रंगवणारे कलाकार, परिसंवादात बोलणारे शिक्षक आदी सर्व जण मिळून साक्षरता सप्ताहाला लोकचळवळ बनवत असतात. यामुळे डिजिटल साक्षरतेचे भवितव्य या उपक्रमांवर अवलंबून आहे. गावोगावी प्रशिक्षण शिबिरे, स्वयंपूर्ण शिक्षणासाठी संधी, खेळाच्या माध्यमातून शिकवणे,आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअॅलिटी) व संगणक प्रतिरूप (सिम्युलेशन) यांचा अभ्यासक्रमात समावेश, हे सगळे टप्प्याटप्प्याने साकारले पाहिजे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “शिक्षणाचा हक्क” याबरोबरच “तंत्रज्ञानाचा हक्क” ही संकल्पना स्विकारली गेली पाहिजे.

दरम्यान, जागतिक साक्षरता दिन २०२५ हा आपल्याला एक ठोस संदेश देत आहे की, ‘अक्षरज्ञान हे पहिले पाऊल आहे, पण डिजिटल ज्ञानाशिवाय प्रगतीचे पाऊल अपूर्ण आहे’. सामाजिक न्याय, रोजगार संधी आणि समानता प्रस्थापित करायची असेल तर, प्रत्येक हातात अक्षरासोबत डिजिटल साधनांचे सामर्थ्य असले पाहिजे.

  • राजेश क्षीरसागर,
    शिक्षण सहसंचालक
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!