
सुपरकेन ऊस रोपवाटिका पहाणी करताना अजित जगताप, दत्तात्रय राऊत, योगेश भोंगळे,राजेंद्र पालवे, दत्तात्रय लोखंडे,मिलींद गडदे आदि.
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०१ सप्टेंबर २०२५):-ढवळ ता.फलटण. ऊस उत्पादनाचा एकरी शंभर मे. टनांचा टप्पा गाठण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ, डॉ.बाळकृष्ण जमदग्नि यांनी विकसीत केलेले सुपर केन नर्सरी तंत्र फायदेशीर ठरेल असे मंडळ कृषि अधिकारी, अजित जगताप यांनी सांगीतले.
ढवळ ता.फलटण येथे प्रगतीशील शेतकरी श्रीरंग संदीपान लोखंडे यांच्या शेतावर महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या ऊस उत्पादकता वाढ मोहिम अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी खालिद मोमीन, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सुपर केन नर्सरी तंत्र ऊस रोपवाटीका प्रात्यक्षिक पाहणी प्रसंगी जगताप बोलत होते.
यावेळी उप कृषि अधिकारी, दत्तात्रय राऊत, राजेंद्र पालवे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय लोखंडे,मिलींद गडदे, राजकुमार लोखंडे,दिपक मोहिते आदि उपस्थीत होते.
ते पुढे म्हणाले की, सुपर केन नर्सरी तंत्राचा अवलंब केल्यास कमीत कमी खर्चात,कमी कालावधीत निरोगी,सशक्त व जोमदार ऊस रोपे तयार करता येतात. तसेच जलद उगवण होऊन केवळ बावीसव्या दिवसापासून रोपे लागवडीसाठी वापरता येतात.रोपांची तान सहनशीलता वाढते,जीवाणू संवर्धनाची बेने प्रक्रिया सहज करता येते यामुळे रासायनिक खत मात्रेमध्ये बचत होते, किड-रोग प्रतिकार क्षमता वाढल्याने रोपे कणखर होतात. तसेच वाहतुकीस सोईस्कर होऊन उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याने ऊस उत्पादकांनी ऊस रोपे निर्मितीसाठी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा व खर्च कमी करून अधिकाधीक ऊस उत्पादन घ्यावे.
प्रात्यक्षिक आयोजन सहाय्यक कृषि अधिकारी योगेश भोंगळे यांनी केले. अशा प्रकारच्या रोपवाटीका ढवळ गावचे प्रगतशील शेतकरी निलेश गार्डी,सुनिल गार्डी, अरविंद राक्षे, सुनिल सरक यांनी उभारल्या आहेत. या सुपरकेन रोपवाटीकेला परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांनी भेटी देऊन ऊस रोपे तयार करण्याचे सोपे अल्प खर्चिक आणि फायदेशीर तंत्र अवलंबणार असल्याचे आवरजुन सांगीतले.
