
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १८ सप्टेंबर २०२५):-
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त गोविंद परिवारातील सदस्यांचा कौतुक सोहळा मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे उत्साहात संपन्न झाला.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत अत्यंत सचोटीने व प्रामाणिक पद्धतीने कार्यरत राहून गोविंद मिल्कने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली असल्याचे गौरवोद्गार यावेळी मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी काढले.
लवकरच गोविंद मिल्क हे एक आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून नावारूपाला येईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी संपूर्ण गोविंद परिवारासह चेअरमन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर व या प्रवासात त्यांना खंबीर साथ देण्याया श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी हस्यजत्रा फेम श्री. समीर चौगुले यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना मा. महाराजसाहेब यांनी आपले बंधू श्रीमंत संजीवराजे यांचा येणारा वाढदिवस आपण फलटणमध्ये उत्साहात व जल्लोषात साजरा करणार असल्याचे जाहीर केले.


