
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २१ सप्टेंबर २०२५):-
महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या गोरगरीब विदयार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, त्या माध्यमातून शेकडो वर्षे अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या समाजाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करावा हा दुरदुष्टीचा विचार करून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी झाला, खरेतर २२ सप्टेंबर हा दिवस जगात अयन दिन’ म्हणून गणला जातो. या दिवशी दिवस व रात्र दोन्ही समान असतात. समानतेचे प्रतिक असणाच्या या दिवशीच भाऊरावांचा जन्म झाला. आणि भाऊरावांनी शिक्षण व समाजकार्यातून समानता निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, म्हणून आपण कर्मवीर जयंतीच्या “निमित्ताने कर्मवीरांच्या विचारांचा जागर खऱ्या अर्थाने करत आहोत.
काले ता. कराड, जि. सातारा या ठिकाणी ५ सप्टेंबर १९१९ रोजी सत्यशोधक समजाची परिषद भरली होती. पुण्याचे प्रसिध्द वकील केशवराव बागडे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्राच्या सर्व भागातील प्रतिनिधी परिषदेस उपस्थित होते. या परिषदेमध्ये भाऊरावांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासंबंधी आपले विचार मांडले. हे विचार आचरणात आणण्यासाठी एका शैक्षणिक संस्थेची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
‘रयत शिक्षण संस्था’ या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी असा ठरावही भाऊरावांनी परिषदेत मांडला. सदर ठराव परिषदेने एकमताने मंजूर केला. त्यानुसार काले येथेच ४ ऑक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर ‘रयत शिक्षण संस्था’ अस्तित्वात आली. स्वतःच्या मालकीची जमीन स्वतः कसणाऱ्याला ‘रयत’ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा प्रजेला ‘रयत’ म्हणून संबोधत असत. भारतामध्ये कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी.एस. आर.) योजनेअंतर्गत कंपनी कायदा २०१३ साली केला गेला व त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१४ साली सुरू झाली. भारतातील कंपन्यांनी आपल्या नफ्याच्या २% इतकी रक्कम सेवक वेल्फेअर फंडिंग अंतर्गत समाजातील शिक्षण व पर्यावरण याकरिता द्यावी, असे त्या कायद्यान्वये ठरविण्यात आले. आताची सी. एस. आर. योजना सुरू होण्याच्या १०० वर्षांपूर्वी १९१२ सालीच ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अमलात आणण्याचा विचार मांडलेला होता. याकरिता धनजीशा कूपर यांच्या कूपर इंजिनिअरिंग वर्क्सला मदत करायचे त्यांनी ठरविले व कूपर यांना कंपनीच्या नफ्यातील १०% रक्कम बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थांच्या शिक्षणाकरिता खर्च करण्याची अट म्हणजेच आत्ताची सीएसआर योजना आहे, हे आपणाला अभिमानाने सांगावेसे वाटते. भाऊरावांनी अत्यंत माफक दरात कूपर यांच्या नांगरांची विक्री केली. कूपर यांना नफा मिळवून दिला. परंतु कूपर यांनी ही मागणी फेटाळली. त्यामुळे भाऊराव व कूपर यांच्यात वाद निर्माण झाले व कूपर यांच्याशी भाऊरावांनी फारकत घेतली. १९१२ ते २०१३ म्हणजे जवळपास १०१ वर्षांनी भारत सरकारला हा अण्णांचा विचार पटला. व त्यांनी सीएसआर फंडिंग कायदा केला, या याकरिता १०० वर्ष वाट पाहावी लागली. अण्णांकडे व्यापक दूरदृष्टी होती हेच यावरून दिसून येते .म्हणून अण्णांच्या अनेक योजना भारत सरकारने स्वीकारलेल्या आहेत. या सर्व विचारांना प्राधान्य देऊन त्यांना भारतरत्न देण्याची मागणी समाजातून होताना दिसते. रयत शिक्षण संस्थेकडे विविध विद्यालये चालविण्यासाठी ठोस उत्पन्नाचा कोणताही मार्ग नव्हता. रयत शिक्षण संस्थेचे मुख्य ध्येय बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करून शैक्षणिक जागृती करणे हा होता. रयत शिक्षण संस्थेचे कार्य आरंभापासून बारकाईने पाहून त्या कार्याबद्दल सहानुभूती बाळगणारे अनेक सद्गृहस्थ महाराष्ट्रात होते. या सर्वांचा उपयोग करून हे देणगीरूपाने रयत शिक्षण संस्थेतील विद्यालयांना मदत मिळविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कर्मवीर भाऊराव पाटलांनी घेतली. भाऊराव म्हणत, जे गाव संस्थेस मोफत जागा व प्राथमिक स्वरूपाचा खर्च देईल, त्या गावी रयत शिक्षण संस्थेतर्फे मी हायस्कूल काढीन व त्यामध्ये श्रम व स्वावलंबनाच्या तत्त्वावर शिक्षण घेणाऱ्या मुलांना मोफत शिक्षण देईन ! फलटणच्या श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकरांनी आपला फलटण लॉज बंगलाच १९४० साली ‘महाराजा सयाजीराव फ्री अॅन्ड रेसिडेन्शल हायस्कूलकरिता बक्षीस दिला होता. सांगली जिल्ह्यातील माहुली गावातील विठ्ठलराव देशमुख यांनी आपल्या धाकट्या बंधूना हुंड्यासाठी मिळालेली ८ हजार रुपये ही रक्कम कर्मवीर भाऊरावाना विवाह मंडपात बोलावून दिली. तदनंतर ७८ एकर जमीन संस्थेस देणगी म्हणून दिली. वसतिगृह, शाळा, ट्रेनिंग कॉलेजसाठी त्यांनी वारवार मदत केली. ग्वाल्हेरचे महाराज जिवाजीराव शिंदे पुणे मुक्कामी आल्यानंतर त्यांना भाऊराव पाटील भेटले व म्हणाले. आम्ही सातारकर लोक फार रांगडे, बेडर व निर्भय देखील! तुम्ही तुमचे वापरात नसलेले वाडे आमच्या कार्यास दिले नाहीत तर या तुमच्या वाड्यांचा बेवारशी प्रेते जाळण्यास लोक वापर करतील. गावातील डुकरं तेथे लोळत पडतील. या तुमच्या राजवाड्यांचे काय चीज होईल ? उलटपक्षी तुमचे हे वाडे आणि जमीन माझ्या संस्थेला दिलीत तर आम्ही तेथे सोने पिकवू. आपल्या प्रतापी पूर्वजांच्या नावाने म्हणजे महादजी शिंदे यांच्या नावाने हायस्कूल सुरू करू. या शाळेमधून एखादा भावी महादजी शिंदे निर्माण होऊन तो या लोकशाहीच्या जमान्यात पुन्हा दिल्लीच्या तख्त्यावरही जाऊन बसेल…! आपल्यासारख्या महाराजांच्या समोर अशाप्रकारचे बोलणे उद्धटपणाचे वाटेल. पण या पवित्र कार्यासाठी, आपण पूर्वजांच्या स्मरणासाठी हे सर्व द्यावे, अशी माझी विनंती आहे. एवढा रोखठोक बोलणारा आणि कार्याविषयी तळमळ असलेला हा माणूस पाहून महाराजांनी तीन वाडे आणि १३०० एकर जमीन स्वः खर्चाने बक्षीसपत्र करून दिली. देणगीतून मंदिरे उभारणारे अनेक जण या भारतात आहेत. मात्र, देणगीतून ज्ञानमंदिरे उभारणारे कर्मवीर भाऊराव पाटील जगात एकमेव आहेत, असे मला वाटते.
त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या कार्याची प्रगती कळवून ‘इमारत देणगीसाठी विनंती करणारे कोल्हापूरच्या भास्करराव जाधव यांना ३ ऑगस्ट १९४२ साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लिहिलेल्या पत्रातून देणगीबाबतचा विचार लक्षात येतो. या पत्रात ते म्हणतात, रयत शिक्षण संस्थेविषयी सहानुभूती बाळगणारे जे प्रमुख सद्गृहस्थ महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी आपण एक आहात. आपली बहुजन समाजाबद्दल असणारी कळकळ सर्वश्रुत आहेच. आपण आम्हास दान केल्यास ते खात्रीने उच्च सत्याचे दान ठरणार आहे. साहजिकच त्यांच्या कार्याची तळमळ व धडपड पाहून लोक देणगीरूपाने रक्कम, जमिनी देत व त्यावरच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाल्याचे दिसून येते.
भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था ही लोकांनी लोकांच्या खर्चातून लोकांसाठी चालविलेली संस्था आहे. लोक भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यास कसलीही परतफेडीची अपेक्षा न करता सढळ हाताने मदत करीत असत. आज याच रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरत असल्याचे दिसून येते. म्हणून आज त्यांच्या जयंतीदिनी आणांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. (लेखन – श्री विकास जाधव) (M.A.B.ed, D.Ed, SET,NET)-उपशिक्षक आर. एन. आगरवाल टेक बारामती)
व्याख्याते, बहिशाल विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.


