आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटींचा पुरस्कार देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

फलटण टुडे वृत्तसेवा ( मुंबई,२२ सप्टेंबर ३०२५):-

पुढील वर्षापासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी जाहीर केले.

शब्द घडवतो विचार, विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश. या प्रवासाची सुरुवात शिक्षकांकडून होते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज व राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत. शाळा बदलते पण त्यासाठी एक जिद्दी शिक्षक लागतो अशा शब्दात मंत्री श्री. भुसे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, शिक्षकांचा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच नाही तर समाजाच्या जडणघडणीसाठी महत्वाचा आहे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्‍ज्ञांची भूमी असून त्यांच्या कार्यातून समाजात परिवर्तन घडले. आजचे शिक्षक या परंपरेचे वारस आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे. वारे गुरुजी, केशव गावित सर, दिलीप नाकाडे यांसारख्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. राज्यात गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण दिले जात असल्याचे सांगून आदर्श शिक्षकांची बँक स्थापन करून त्यांच्या उत्तम कामांचा अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर तसेच निपुण महाराष्ट्र अभियानाद्वारे वाचन, लेखन व अंकज्ञान कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन- डॉ.पंकज भोयर

महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोठ्या उत्साहात नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू असून, राज्य शासनाकडून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या पीएम श्री स्कूल योजनेप्रमाणेच राज्यातही निवडक शाळांची निवड करून या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड ॲसेसमेंट इंडिया यांच्यासोबत करण्यात आलेला सामंजस्य करार आदींबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रकमेतील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सी. व्ही. रमण सायन्स सेंटर (नागपूर), जिल्हास्तरीय विजेत्यांना इस्रो (बेंगळुरू), तर राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांना थेट नासाला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी प्रास्ताविकात पुरस्कारांविषयी माहिती दिली. तर संचालक महेश पालकर यांनी आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!