सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025’ चे उदघाटन संपन्न झाले.

फलटण टुडे वृत्तसेवा ( मुंबई ,४ ऑक्टोबर २०२५):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, आपण डिजिटल युगात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे या युगाला साजेशी मूल्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आजच्या काळात सायबर गुन्हे रोखणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शोधून त्याला शिक्षा करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच असे गुन्हे होऊ नयेत यासाठी व्यापक जनजागृती करणे देखील आवश्यक आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले अनेक नागरिक बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) गैरवापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग यांसारख्या पद्धतींचा वापर वाढला आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार आणि पेमेंट्समधील माहितीचा गैरवापर होऊन स्कॅम, एक्स्टॉर्शन आणि सायबर बुलिंगसारखे प्रकार घडतात. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून वेळेवर तक्रार करणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात जागतिक दर्जाची सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे गुन्हा घडल्यानंतर तात्काळ कारवाई करून नुकसान मर्यादित करता येते. मात्र त्यासाठी तक्रार वेळेवर होणे आवश्यक आहे. कोणताही डिजिटल गुन्हा हा त्याचा ‘डिजिटल फिंगरप्रिंट’ मागे ठेवतो, आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी राज्याची क्षमता सतत वाढवली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे ही आजची गरज आहे. ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकींबाबत नागरिकांना जागरूक करणे आवश्यक आहे. अशा घटनांमध्ये 1930 किंवा 1945 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचता येते.

या कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे सायबर जनजागृतीचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत, विशेषतः तरुणाईपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!