अनुकंपाधारक उमेदवारांचा अनुशेष संपणार! 5187 उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार!

फलटण टुडे वृत्तसेवा ( मुंबई ,४ ऑक्टोबर २०२५):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली असून येत्या 4 ऑक्टोबर रोजी 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी 5122 एमपीएससीतर्फे निवड झालेल्या उमेदवारांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार असून, एकाचवेळी तब्बल 10,309 उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार आहेत. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या 100 आणि 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा मुलास अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. परंतु तांत्रिक अडचणी व इतर विलंबामुळे अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. ही संवेदनशील बाब ओळखून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना देऊन सातत्याने आढावा घेतला. त्यानंतर नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले आणि त्यामुळेच एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुक्तीपत्रे मिळणार आहेत.

या सोबतच एमपीएससीच्या लिपिक-टायपिस्ट श्रेणीतील 5122 उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे मिळतील. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी कोकण विभागातील 3078 उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. विदर्भातून 2597, मराठवाड्यातून 1710, पुणे विभागातून 1674 आणि नाशिक विभागातून 1250 उमेदवारांचा समावेश आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!