अवघ्या २ वर्षात फार्मसी कॉलेजने केलेली प्रगती कौतुकास्पद, आगामी काळात हे महाविद्यालय गरुड भरारी घेईल : प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव

दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन आणि फित कापून मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी पहिल्या छायाचित्रात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर उपस्थित प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव, शिल्पा मेडिकेअरचे सुनील करपे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर दुसऱ्या छायाचित्रात फीत कापून पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव व अन्य मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १६ आक्टोबर २०२५). : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गेली ७० वर्षे दर्जेदार शिक्षण देवून गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे सुरु असलेले काम निश्चित प्रेरणादायी आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाची संधी या संस्थेने उपलब्ध करून दिली, मात्र व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यास उशीर का केला असा सवाल करीत आता एकापाठोपाठ एक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करुन त्यामध्येही या संस्थेने प्राप्त केलेली गुणवत्ता निश्चितच कौतुकास्पद असल्याचे कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी कराडचे प्राचार्य डॉ. ए व्ही यादव यांनी आवर्जून सांगितले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी, फलटण येथे डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय पोस्टर प्रेडोंटेशन स्पर्धा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी, कराडचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव सर आणि शिल्पा मेडिकेअर रायचूर, कर्नाटक या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हा. प्रेसिडेंट सुनिल कर्पे यांचे हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य सर्वश्री भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, शिरीष दोषी, शिरीष भोसले, रणजित निंबाळकर, शरदराव रणवरे, प्रा. सी. डी. पाटील, सौ. सौ. नूतन शिंदे, सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, अविनाश नरुटे, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धुमाळ व त्यांचे सहकारी पदाधिकारी, फार्मसी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह राज्यातील विविध फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
फलटण एज्युकेशन सोसायटीने सुरु केलेले फार्मसी कॉलेज यावर्षी द्वितीय वर्षात असताना या कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे धाडस करुन राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उत्तम आयोजन केले ही कौतुकास्पद बाब असून आगामी काळात हे कॉलेज निश्चित उत्तुंग भरारी घेईल असा विश्वास प्राचार्य डॉ. यादव यांनी व्यक्त केला.
आपल्या क्षेत्रात प्रगतीचे सर्वोच्च स्थान मिळविण्याचे ध्येय ठेवून त्यासाठी प्रयत्नशील राहण्यातच प्रगतीचा वरचा टप्पा गाठता येत असल्याचे आवर्जून सांगत विद्यार्थ्यांनी नेहमी उच्च ध्येय ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या क्षेत्रातील आपल्या उज्वल यशाचे कौतुक प्रारंभी प्राचार्य देशमुख यांनी केले, तथापि हे यश प्राप्त करण्यासाठी आपण कोणतेही काम करताना कमीपणा मानला नाही. कष्ट करताना सतत तयारी ठेवली म्हणून आज हे उच्च पद किंवा यश मिळाल्याचे निदर्शनास आणून देत १० वर्षांपूर्वी आपण एका छोट्या कंपनीत काम केले मात्र आज मेहनतीने उज्वल यश प्राप्त करता आले असेच प्रयत्न फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी करावेत अशी अपेक्षा शिल्पा मेडिकेअर कंपनीचे व्हा. प्रेसिडेंट सुनील करपे यांनी व्यक्त केली.
फलटण एज्युकेशन सोसायटी सुमारे ७० वर्षांपूर्वी सुरु होऊनही या संस्थेने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यास उशीर केला ही बाब खरी आहे तथापि प्रारंभा पासून दर्जेदार शिक्षण देऊन गुणवंत विद्यार्थी घडविण्याची धारणा या संस्थेने आणि संस्था चालकांनी स्वीकारली असल्याने कोणताही अभ्यासक्रम पूर्ण माहिती घेऊन त्यासाठी आवश्यक साधने – सुविधा, प्रशस्त इमारती उभ्या करुनच सुरु करण्याचा प्रयत्न असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यास उशीर झाला असला तरी आता अवघ्या एक वर्षात फार्मसी कॉलेजने राज्यस्तरावर घेतलेली स्पर्धा किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने अल्पावधीत मिळविलेले यश आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेली पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा किंवा कृषी व अन्य महाविद्यालयांनी त्यांच्या क्षेत्रात मिळविलेले यश किंवा नॅक प्रमाणपत्र आम्ही सतत गुणवत्तेला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट करतात असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
प्रारंभी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह देशमुख यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात महाविद्यालयाने उत्तुंग भरारी घेत राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धांचे आयोजन करतानाच डी फार्मसी व बी फार्मसी अभ्यासक्रमासाठी पहिल्या फेरीतच सुमारे ४४ जागा भरण्यात यश प्राप्त केले असून आगामी काळात दोन्ही विभागाच्या सर्व साठ जागेवर पुरेसे विद्यार्थी उपलब्ध असतील याची ग्वाही दिली.
प्राचार्य देशमुख पुढे म्हणाले, महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्हयांतील सुमारे ५५ फार्मसी महाविद्यालयातील एकूण ११० टीमने सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध महाविद्यालयातून दाखल झालेले विद्यार्थी फार्मसी क्षेत्रातील विविध विषयांवर उत्कृष्ट पेपर प्रेझेंटेशन करतील ज्यामुळे या क्षेत्रातील संशोधनाला गती येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटन सत्रानंतर लगेचच राज्यभरातून दाखल झालेल्या विविध फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प उपस्थितांसमोर सादर केले आणि त्याची वैशिष्ट्ये उपस्थितांना समजावून दिली. परीक्षकांनी या स्पर्धकांच्या गुणवत्ता तपासून त्यानंतर विजेत्या स्पर्धकांची यादी जाहीर केली, त्यानुसार डी. फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आष्टा, जिल्हा सांगली येथील साहिल तौफिक शिरढोणे व पृथ्वीराज चव्हाण या विद्यार्थ्यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक वेणूताई चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, फलटण येथील कु. निता चौधरी व कु. जिया चौधरी या विद्यार्थिनींनी मिळविला. तृतीय क्रमांक संतकृपा शिक्षण संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव, ता. कराड येथील कु. वैष्णवी वारगळ व कु. ऋतुजा धुमाळ यांनी पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले.
बी. फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक कॉलेज ऑफ फार्मसी, माळेगाव बु।। येथील प्रसाद कुमठेकर व मानसी कुसेकर यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, मसूर येथील उदयनराज भोसले व कु. सृष्टी साळुंखे यांनी आणि तृतीय क्रमांक सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील कु. प्रियांका बाबर व प्रज्वल जगदाळे यांनी पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले.


