युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय युसीसी स्पर्धा उत्साहात.

दिल्लीचा विनोद विश्वकर्मा प्रथम पुरस्काराचा मानकरी

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा सन्मान करताना युईआय ग्लोबलचे सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती,दि २७ डिसेंबर २०२५):-
युईआय ग्लोबल एज्युकेशन संस्थेची संस्थांतर्गत तिसरी राष्ट्रीय पाककृती( कलनरी) स्पर्धा अर्थात युसीसी पुण्यात उत्साहात संपन्न झाली
या स्पर्धेत युईआय ग्लोबलच्या देशभरातील नऊ अभ्यासकेंद्रातील प्रथम वर्षाच्या १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कलनरी स्पर्धेत दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवत मानाचा चषक आणि “मास्टर शेफ २०२५ ” किताब पटकवला. पुण्याचा ओंकार राजू देशमुख याने दुसऱ्या क्रमांकावर तर पुण्याच्याच दंडोती मोहम्मद दानिश रियाज याने तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली.प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रुपये ५१०००,/- पदक,गोल्डन शेफ कोट यासह ” मास्टर शेफ” या किताबाने सन्मानित करण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्यांना रोख रुपये ३१०००/- आणि तिसऱ्या क्रमांकाला रोख रुपये ११०००/- पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राच्या शैलेंद्र लक्ष्मण परदेशी या विद्यार्थ्याने मिस्ट्री बॉक्स चॅलेंज मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर ग्लोबल बिर्याणी फेरीत दिल्लीच्या अमिनेश अंबरने बाजी मारली.
युईआय ग्लोबलची कलीनरी (युसीसी) स्पर्धा हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या मुलांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून देते या स्पर्धेत विद्यार्थी भारतातील विविध प्रादेशिक, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ तयार करून परीक्षकांची शाबासकी मिळवतात. युसीसी ही स्पर्धा मास्टर शेफ च्या धर्तीवर घेतली जाते आणि प्रथम वर्षाला असणारे विधार्थी स्पर्धक असतात.
युसीसी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयसीएफ अध्यक्ष शेफ देवींदरकुमार उपाध्यक्ष शेफ सिरीश सक्सेना, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकारी डॉ. जयदीप निकम, रेडिसन हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज सक्सेना, देवव्रत जातेगांवकर, रिटझ कार्लटनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत पाट्रो आणि युईआय ग्लोबलचे सीईओ तथा व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ शैलेंद्र देवाळाणकर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि हॉटेल व्यवस्थापन आणि पाहुणचार या क्षेत्रात आपले उज्ज्वल भविष्य व्हावे यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनीष खन्ना म्हणाले की ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती, कल्पना, कष्ट करण्याची तयारी, स्पर्धेचा अनुभव, कुशलता, तंत्रज्ञान आणि पदार्थांची चव यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणारी स्पर्धा आहे. १९ वर्षांपासून युईआय ग्लोबल ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय स्पर्धामध्ये आपले विद्यार्थी चमकत असल्याचा अभिमान असल्याचा दावा मनीष खन्ना यांनी केला. विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून पुणे,महाराष्ट्र आणि देशाभरातील हॉटेल व्यवसायातील अनेक दिग्गज लोकांना या स्पर्धेसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.विशेष निमंत्रितांनी या स्पर्धेत हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे परीक्षण केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!