
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २७ डिसेंबर २०२५):-फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 मध्ये जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये फलटण तालुक्यातील श्री. अक्षय शिंदे ऊस उत्पादक शेतकरी, श्री. मधुकर सस्ते द्राक्ष उत्पादक, सौ. नीता नलवडे आधुनिक दुग्ध व्यावसायिका, श्री. दत्तात्रय शिंदे डाळिंब उत्पादक, श्री. सागर नाळे भाजीपाला उत्पादक, श्री. दीपक शिंदे व श्री. प्रकाश कदम केळी उत्पादक ह्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदरील सन्मान प्रसंगी राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कृषी विभागाचे पदाधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, महाविद्यालयीन समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार उपस्थित होते. कृषी प्रदर्शनातील सर्व निविष्ठा कंपन्यांना फलटण व परिसरातील शेतकरी, युवक, महिला बचत गट, महिला शेतकरी यांचा बहुमोल प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवशी अखेरपर्यंत फलटण व परिसरातील ४५००० शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन बहुमोल असा प्रतिसाद दिला. कृषि प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये फलटण परिसरातील शेतकऱ्यांनी शेती तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजक करत आहेत.

