
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २८ डिसेंबर २०२५):-फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 च्या चौथ्या दिवशी कृषी प्रदर्शनातील सर्व निविष्ठा कंपन्यांना फलटण व परिसरातील शेतकरी, युवक, महिला बचत गट, महिला शेतकरी बहुमोल प्रतिसाद मिळाला. फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी सायंकाळी कृषी प्रदर्शनाला भेट दिली व कृषी प्रदर्शनातील सर्व स्टॉलची सविस्तर माहिती घेतली. चौथ्या दिवशी अखेर पर्यंत फलटण व परिसरातील एक लाख पाच हजार (१०५०००) शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन बहुमोल असा प्रतिसाद दिला. कृषी प्रदर्शन आयोजन समितीतर्फे श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला. कृषि प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये फलटण परिसरातील शेतकऱ्यांनी शेती तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी व्यक्त केले.


