वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका सन २०२६ चे प्रकाशन संपन्न

दिनदर्शिका प्रकाशनानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना एक प्रत भेटी दाखल देण्यात आली.

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि. २८ डिसेंबर २०२५) : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान असल्याचे निदर्शनास आणून देत या संस्थेद्वारा उत्कृष्ट आणि उपयुक्त दिनदर्शिका तयार केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना या दिनदर्शिकेद्वारे जैन समाजातील सर्व तिथी, उत्सव, धार्मिक कार्यक्रमाविषयी अचूक माहिती प्राप्त होत असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सांगितले.
जैन धर्मियांची दक्षिण काशी धर्मनगरी फलटण येथे वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ. इंदुमती मेहता यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त उदयभई शहा, राजेंद्रभई कोठारी, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीपाल जैन, उपाध्यक्ष रमणलाल रणदिवे, खजिनदार श्रीकांत सवळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शशीकुमार रणदिवे, निवृत्त उपप्राचार्य सुरेश जैन सर, शरद सवळे, सौ. अपर्णा जैन, सौ. संगीता जैन, बहुसंख्य श्रावक – श्राविका उपस्थित होते.
जैन समाजातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बिनव्याजी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्याची उत्तम सोय संस्थेद्वारा होत असल्याचे आवर्जून सांगत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा यावेळी अरविंद मेहता यांनी व्यक्त केली.
आचार्य आर्यनंदी महाराजांच्या फलटण येथील चातुर्मास कालावधीतील आठवणीनां उजाळा दिला. महाराजांनी तीर्थरक्षा करिता भरीव कार्य केल्याचे उदय शहा यांनी आवर्जून सांगितले.
प्रारंभी श्रीपाल जैन यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात फलटण जैन धर्मीयांची दक्षिण काशी संबोधली जात असल्याचे निदर्शनास आणून देत फलटण येथे प्रथम आचार्य श्री १०८ शांतीसागर महाराज यांचे ३ चातुर्मास झाल्याचे नमूद केले. वात्सल्य मूर्ती आचार्य आर्यनंदी महाराजांनी तीर्थरक्षा बरोबरच गुरुकुल स्थापन करुन जैन समाजातील गरीब मुलांना शिक्षणाची द्वारे खुली केली असल्याचे निदर्शनास आणून दिले.

दिनदर्शिका प्रकाशनानंतर उपस्थित सर्व समाज बांधवांना दिनदर्शिकेची एक प्रत नववर्षाची भेट म्हणून देण्यात आली. समारोप व आभार प्रदर्शन सौ. अपर्णा जैन यांनी केले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!