
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २९ डिसेंबर २०२५):-राजुरी गावचे सुपुत्र व सध्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे गणित आणि शारीरिक शिक्षण या विषयाचे अध्यापन करत असणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री. बी.बी. खुरंगे सर दि.31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत .त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा व थोडक्यात परिचय:-
त्यांचे संपूर्ण नाव श्री .बंडू बबन खुरंगे हे असून त्यांचा जन्म 01/01/ 1968 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील कै. बबन बंडू खुरंगे हे प्रतिष्ठित शेतकरी होते. त्यांचे समाजकारण व राजकारणात योगदान होते. त्यांच्या आई श्रीमती पार्वतीदेवी बबन खुरंगे ह्या गृहिणी आहेत. त्यांचे बंधू श्री. नंदकुमार बबन खुरंगे हे राजुरी विकास सेवा सोसायटी, राजुरीचे माजी चेअरमन आहेत. सरांच्या पत्नी सौ. उर्मिला बंडू खुरंगे या गृहिणी आहेत. त्यांना यशराज व राजदीप हे दोन मुले आहेत. यशराज हा बी. टेक. पदवीधारक असून तो हॉकीचा राष्ट्रीय खेळाडू आहे . सध्या तो मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. राजदीप शेती व्यवसाय करतो.श्री. बी.बी. खुरंगे सर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा राजुरी ता. फलटण येथे झाले व माध्यमिक शिक्षण कै. संजय गांधी विद्यालय ,गुणवरे ता. फलटण या ठिकाणी झाले.उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व बी.एस्सी. रसायनशास्त्र ही पदवी मुधोजी महाविद्यालय फलटण व एम.ए स्सी रसायनशास्त्र हे सरांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून प्राप्त केले. व्यावसायिक पदवी बी.एड. शारीरिक शिक्षण चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन ,गुलटेकडी पुणे या ठिकाणी झाले. सरांची एकूण सेवा 34 वर्ष झालेले आहे. राजुरी येथे फलटण एज्युकेशन सोसायटीचे नवीन माध्यमिक विद्यालय जून 1992 ला सुरू झाले व सरांनी तेथेच नोकरीची सुरुवात केली. 1994 ते 2001 पर्यंत श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल ,फलटण येथे गणित विषयाचे सरांनी अध्यापन केले. 2001 पासून सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी येथे शिक्षण सेवक म्हणून सरांची नेमणूक झाली .त्यानंतर मार्च 2003 पासून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे सरांची बदली झाली. ते या शाळेत आज अखेरपर्यंत कार्यरत आहेत. गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करीत असताना प्रत्येक वर्षी ते ज्या वर्गाला शिकवीत असत. त्या वर्गातील एक तरी विद्यार्थी गणित विषयात पैकीच्या पैकी गुण घेऊन उत्तीर्ण होत असे. जून 2003 पासून हॉकी खेळाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांना देण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत हॉकी खेळाचे प्रशिक्षक म्हणून यशस्वीरित्या ते जबाबदारी पार पाडत आहेत. अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडवण्यामध्ये सरांची मोलाची भूमिका आहे. फलटण येथे झालेल्या अनेक खो-खो व हॉकी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली आहे. यावर्षी नेहरू चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शाळेच्या 17 वर्षाखालील मुलीच्या संघाने एन.आय.एस हॉकी प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर व श्री. सचिन धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच अजिंक्यपद पटकाविले व दिल्ली येथे झालेल्या नेहरू चषक राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सहभाग घेऊन चमकदार कामगिरी केली. याच वर्षी शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शाळेच्या 14 वर्षाखाली मुली व 17 वर्षाखाली मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले आहे. सरांचे शाळातील अध्यापन व खेळासाठीचे योगदान मोठे आहे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर यांच्या सतत मार्गदर्शनामुळे त्यांना प्रोत्साहन व पाठिंबा मिळत गेला. तसेच संस्थेचे सर्वच पदाधिकारी शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक सहकारी व क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक यांच्या सर्वांचे त्यांना सहकार्य व मार्गदर्शन लाभत असते.त्यांनी आजपर्यंत अनेक शाळेतील गुणवंत विद्यार्थी व खेळाडू घडवण्यासाठी अपार मेहनत घेतलेली दिसून येते. याबद्दल समाजातून त्यांच्याबद्दलची एक आपुलकीची भावना नेहमी दिसून येते. अशा सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम 31 डिसेंबर २०२५ रोजी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या ठिकाणी होणार आहे. सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शब्दांकन-
श्री. तायाप्पा मारुती शेंडगे
जिमखाना विभाग प्रमुख
(कनिष्ठ विभाग )मुधोजी महाविद्यालय फलटण




