३९ वी किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत साताऱ्याचे पहिलेच किशोर अजिंक्यपद

धाराशिवचे किशोरी गटात पाचवे सुवर्णशिखर! वडाळ्यात इतिहास रचला!थरारक अंतिम सामने, जिद्द–डावपेच–वेगाचा संगमअष्टपैलू खेळाडूचा राणा प्रताप पुरस्कार साताऱ्याच्या आयुष यादवला तर हिरकणी पुरस्कार धाराशिवच्या राही पाटीलला

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. ३० डिसेंबर २०२५(क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो संघटनेच्या विद्यमाने श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर आयोजित ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर – १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे संपन्न झाली. या स्पर्धेने महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो खेळाची खरी ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. शेवटच्या श्वासापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यांतून किशोर गटात साताऱ्याने इतिहास घडवत पहिलेच अजिंक्यपद पटकावले, तर किशोरी गटात धाराशिवने आपले वर्चस्व कायम राखत पाचवे अजिंक्यपद आपल्या नावे केले. जल्लोष, थरार, कौशल्य आणि जिद्दीचा संगम अनुभवत वडाळ्याचे मैदान अक्षरशः खो-खोमय झाले. वडाळ्याच्या मैदानावर सुवर्णक्षणांची बरसात झाली.

साताऱ्याचा सुवर्णक्षण : पुण्यावर थरारक विजय (किशोर गट)
अपेक्षेप्रमाणे किशोर गटाचा अंतिम सामना प्रचंड चुरशीचा ठरला. साताऱ्याने पुण्यावर २५–२३ (मध्यंतर १२–१२) असा अवघ्या दोन गुणांनी विजय मिळवत पहिलेच राज्य अजिंक्यपद जिंकले. मध्यंतराला दोन्ही संघांनी १०–१० गुणांसह २–२ ड्रीम गुण मिळवत सामना रंगतदार केला होता. दुसऱ्या डावात साताऱ्याने संयमी व आक्रमक खेळ करत विजयाची कोंडी फोडली. साताऱ्याकडून आयुष यादव (१.५० मि. संरक्षण व ८ गुण), आयुष पांगारे (१.३०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), वरद पोळ (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), स्वराज गाढवे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), स्वराज उत्तेकर (१.३० मि. संरक्षण) यांनी अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. पुण्याकडून कर्तव्य गंदेकर (२ व २.२० मि. संरक्षण व ४ गुण), सोहम देशमुख (१.४५ मि. संरक्षण व ६ गुण), वेदांत गायकवाड (१.३० मि. संरक्षण व २ गुण), सत्यम सकट (६ गुण) यांनी दिलेली झुंज अखेर अपुरी ठरली.

Screenshot

धाराशिवचा डंका : सोलापूरवर वर्चस्व, पाचवे अजिंक्यपद (किशोरी गट)
किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात धाराशिवने सोलापूरवर पूर्ण वर्चस्व गाजवत २४–१८ (मध्यंतर १९–६) असा ५ मिनिटे राखून ६ गुणांनी विजय मिळवला आणि पाचवे अजिंक्यपद पटकावले. पहिल्या डावातच धाराशिवने आक्रमण–संरक्षणाचा अप्रतिम समतोल साधत सामन्याची दिशा ठरवली होती. धाराशिवकडून राही पाटील (३.२० मि. संरक्षण व ६ गुण), स्वरांजली थोरात (२.०५ मि. संरक्षण व ४ गुण), मुग्धा सातपुते (नाबाद २.२० मि. संरक्षण), समीक्षा भोसले (१.५५ मि. संरक्षण व २ गुण) यांनी संघाला सुवर्णमुकुट मिळवून दिला. सोलापूरकडून ऋतुजा सुरवसे (१.५० मि. संरक्षण व ४ गुण), कार्तिकी यलमार (१.५० मि. संरक्षण व २ गुण), आसावरी जाधव (४ गुण) यांनी प्रयत्न केले; मात्र गतवर्षीचे विजेतेपद यंदा टिकवता आले नाही.

वैयक्तिक पुरस्कारांनी चमकले तारे
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी किशोर गटात राणा प्रताप पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) आयुष यादव (सातारा), उत्कृष्ट संरक्षक सोहम देशमुख (पुणे), उत्कृष्ट आक्रमक वरद पोळ (सातारा) यांना प्रदान करण्यात आला. किशोरी गटात हिरकणी पुरस्कार (अष्टपैलू खेळाडू) राही पाटील (धाराशिव), उत्कृष्ट संरक्षक कार्तिकी यलमार (सोलापूर), उत्कृष्ट आक्रमक मुग्धा सातपुते (धाराशिव) यांनी पटकावला.

मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा
या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस संजय शेट्ये, मुंबई खो-खो संघटनेचे व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहयोगी उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, उपाध्यक्षा अश्विनी पाटील, संयुक्त चिटणीस जयांशु पोळ, बाळासाहेब तोरसकर, कार्यालयीन सचिव प्रशांत ईनामदर, पवन अगरवाल (फर्स्ट व्हिडीजि लायन्स क्लब), पीआयओ रवींद्र कडेल (लायन्स क्लब) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी खो-खोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातीतील खेळाचे उज्ज्वल भविष्य
या स्पर्धेने राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंची गुणवत्ता, जिद्द आणि शिस्त अधोरेखित करत खो-खोच्या उज्ज्वल भविष्यास ठोस दिशा दिली. साताऱ्याचा ऐतिहासिक विजय आणि धाराशिवचे सातत्यपूर्ण वर्चस्व हे या स्पर्धेचे खरे वैशिष्ट्य ठरले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!