
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १० डिसेंबर २०२५):-स्काऊट गाईड चळवळीत मुला-मुलींना महत्त्वाचे स्थान आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण लेखी,तोंडी, प्रात्यक्षिक अशा पद्धतीने देण्यात येते. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण व संघपद्धती ही या अभ्यासक्रमाची गुरुकिल्ली आहे. शालेय शिबिर,तालुका मेळावा, जिल्हा व राज्यस्तरीय मेळावा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जांबोरी यातून वर्षभरात शिकता येणार नाही एवढा मोठा या शिक्षणाचा अनुभव मिळत असतो. याच धर्तीवर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा,पंचायत समिती शिक्षण विभाग जिल्हा सातारा आणि सातारा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील कब ,बुलबुल, स्काऊट ,गाईड विद्यार्थी यांच्यासाठी तालुका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी फलटण व खंडाळा तालुक्यातील कब,बुलबुल, स्काऊट,गाईड विद्यार्थ्यांचा तालुका मेळावा मालोजीराजे शेती विद्यालय फलटणच्या भव्य प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाला. या तालुका मेळावा मध्ये फलटण व खंडाळा तालुक्यातून सुमारे 445 कब,बुलबुल,स्काऊट,गाईड विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या मेळाव्यामध्ये स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर आधारित उत्कृष्ट पथकासाठी व कौशल्यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण फलटण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सी.जी. मठपती, तालुका समन्वयक दमयंती कुंभार, शेती विद्यालयाचे प्राचार्य बाळकृष्ण काळे सर, उपप्राचार्य राजेंद्र माडकर, एम के कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) अनिस नायकवडी, जिल्हा आयुक्त (स्काऊट) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.) धनंजय चोपडे, जिल्हा आयुक्त (गाईड) तथा शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे,खंडाळा गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांनी सदर मेळाव्यास शुभेच्छा दिल्या व विजेत्यांचे कौतुक केले. सातारा भारत स्काऊट गाईड कार्यालयातील ट्रेनर्स लक्ष्मण थोरात,प्रताप माने , सुरेश चव्हाण, प्रसाद गायकवाड,ज्योतिनाथ देवगुणे, विश्वास जाधव, काशिनाथ सोनवलकर, बाळासाहेब गंगावणे ,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गाईड) अरुंधती गुजर, सरस्वती झोरे,सुधा कारंडे, रंजना शिंदे, निता सस्ते,योगिनी वाघमारे, सीमा मुळीक यांनी या मेळाव्यासाठी परीक्षक म्हणून कार्य केले. शेती विद्यालयाचे प्राचार्य व सर्व स्टाफ यांचे अनमोल सहकार्य या मेळाव्यासाठी लाभले. मेळाव्याचे नियोजन जिल्हा संघटक (स्काऊट) बाळासाहेब राठोड,जिल्हा संघटक (गाईड) सविता भोळे, वरिष्ठ लिपिक सुनील खाडे यांनी केले.



