अभिष्टचिंतन विशेष लेख चैतन्य रुद्रभटे

फलटण टुडे वृत्तसेवा
काही माणसे ही खुप सभ्यपणाचा आव आणणारी असतात. मी म्हणजे कोणीतरी खूप मोठा, असा खोटा आव आणून एका आभासी जगात ते जगत असतात. मात्र, आज आपण ज्यांच्याविषयी जाणून घेतोय ते तसे नाहीत. चेहऱ्यावर सतत हास्याची झालर आणि त्या हास्याच्या आड लपलेले एक अवली व्यक्तिमत्व म्हणजे सुभाष भांबुरे. सुभाष भांबुरे हे हसर्या चेहर्याचे. त्यांचा चेहरा नेहमी पहावं तेंव्हा हसराच. कधी वाटेवर भेटल्यावर त्यांचा हसरा चेहरा पाहुन माणूस खुश होतो. त्यांना भेटून माणूस सगळे दुःख विसरुन जातो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते भेटले की खुप गप्पा गोष्टी रंगतात आणि हास्य-मस्करी होते. समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेऊन हळूच हास्याचा फवारा उडवणारे सुभाष भांबुरे यांच्यासारखे खूप कमीच आहेत.

अर्थात या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठी तपश्चर्या आहे. ती पत्रकारितेची, टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायाची, फलटण मधील एकमेव ड्रेपरी व्यवसायाची. याखेरीज त्यांनी उभा केलेल्या सामाजिक कामाच्या डोंगराची. माजी आमदार कै. हरीभाऊ निंबाळकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून उभा केलेले काम हे त्यांच्या सामाजिक कार्यातील प्रमुख केंद्रबिंदू मानावे लागेल. सोबतच त्यांनी नामदेव समाजउन्नती परिषद, पालखी सोहळा पत्रकार संघ, घुमान सायकल रॅली यासारख्या विविध माध्यमातून समाजमनाला स्पर्ष केलेला आपल्याला दिसून येतो.

आज भांबुरे हे ५५ वर्ष पूर्ण करुन ५६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आगामी काळात त्यांच्या उद्योग व्यवसायाला आणखी भरारी मिळो आणि सामाजिक कार्याचे एव्हरेस्ट त्यांनी गाठो, याच त्यांना शुभेच्छा…!


