युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी डॉ. सागर आटोळे यांची निवड

यूरोपमधील आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत डॉ. सागर आटोळे भारतीय शैक्षणिक पद्धतीवर मांडणार शोधनिबंध

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती, दि ४ फेब्रुवारी २०२६):-
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सागर आटोळे यांची युरोपमध्ये फिनलंड देशातील हेलसिंकी,याठिकाणी होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सृजनशील शिक्षण परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि धोरणनिर्माते यांना एकत्र आणणारी महत्त्वपूर्ण व्यासपीठ मानली जाते. डॉ. आटोळे यांची निवड ही संस्थेसाठी तसेच संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Screenshot


या परिषदेत भारतीय शैक्षणिक पद्धती, शिक्षणातील बदलते प्रवाह, नवोन्मेषी अध्यापन पद्धती तसेच युरोपमधील शिक्षण व्यवस्था आणि त्यातील आधुनिक दृष्टिकोन यावर सखोल चर्चा होणार आहे. जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा आढावा घेऊन परस्पर अनुभवांची देवाणघेवाण या परिषदेमध्ये होणार आहे.
डॉ. सागर आटोळे हे या परिषदेत स्वतः तयार केलेला शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यांच्या शोधनिबंधामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मूल्याधिष्ठित शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम, तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या उपक्रमांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे. भारतीय आणि युरोपियन शिक्षण पद्धतीतील साम्य-भेद तसेच दोन्ही प्रणालींमधील सकारात्मक बाबींचा समन्वय साधण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.


डॉ. आटोळे यांच्या या निवडीमुळे ज्ञानसागर गुरुकुलच्या शैक्षणिक कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये जागतिक व्यासपीठावर अधोरेखित होणार असून, शिक्षण क्षेत्रात नव्या संधी आणि सहकार्याच्या वाटा खुल्या होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या यशाबद्दल संस्थेचे शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी आनंद व्यक्त करत डॉ. सागर आटोळे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे परिमाण मिळणार असून, भविष्यातही अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानसागर गुरुकुलचा ठसा उमटत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!