१०-१२ जणांच्या टोळक्याने दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ‘अरविंद काळे साहेब’ या गुंडांवर कठोर कारवाई करणार का?

फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ‘अरविंद काळे साहेब’ याना निवेदन देताना फलटण शहरातील नागरिक
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. २३ फेब्रुवारी २०२६):- फलटण शहराला लाभलेला शांततेचा आणि सांस्कृतिक लौकिक काल रात्री शंकर मार्केटमध्ये झालेल्या रक्तरंजित थराराने धुळीस मिळवला आहे. १०-१२ जणांच्या टोळक्याने दहशत माजवत दोन निष्पाप भावांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आज फलटणमध्ये उमटले.
सुप्रसिद्ध ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे डॅशिंग ‘कडू साहेब’ गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढतात आणि गुंडांना वठणीवर आणतात, अगदी त्याचप्रमाणे आता फलटण शहर पोलीस ठाण्याचे डॅशिंग पोलीस निरीक्षक ‘अरविंद काळे साहेब’ या गुंडांवर कठोर कारवाई करणार का? असा थेट सवाल आता फलटणकर विचारत आहेत. “हातात शस्त्रे घेऊन दहशत माजवणाऱ्या त्या फटकुळ दादांची जुन्या गावठाणातून आणि शहरातून धिंड काढा,” अशी आक्रमक मागणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.


पोलिसांना अल्टिमेटम; ‘मोक्का’ लावा अन्यथा ‘फलटण बंद’ ठेवू!
शंकर मार्केट येथे गॅरेज चालवून उदरनिर्वाह करणारे श्री. अनिल विठ्ठल हिरणवाळे आणि श्री. संतोष हिरणवाळे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि शहरातील विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना एक सविस्तर ‘जाहीर निवेदन’ दिले.
“हा हल्ला केवळ एका व्यवसायावर नसून तो फलटणच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. गुन्हेगारांवर तात्काळ ‘खुनाचा प्रयत्न’ आणि ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी. तपास संथ गतीने झाल्यास किंवा आरोपींना पाठीशी घातल्यास संपूर्ण ‘फलटण शहर बंद’ ठेवून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल,” असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेला तीव्र संताप:
- “आम्ही तिथे असतो तर त्यांना नुसते पाठवले नसते…” : “काल जो प्रकार घडला आहे त्या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढण्यात यावी. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत. त्या पोरांचे नशीब आहे की काल आम्ही त्या ठिकाणी नव्हतो. जर आम्ही तिथे असतो, तर आज ही परिस्थिती राहिली नसती, आम्ही त्यांना परत नुसते पाठवले नसते.” – अझरुद्दीन ऊर्फ पप्पूभाई शेख (नगरसेवक)
- “शहरातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करा” : “या भयंकर प्रकाराची तात्काळ दखल घेत पोलिसांनी शहरामध्ये सुरू असणारे सर्व बेकायदेशीर व्यवसाय आणि अवैध विक्री तातडीने बंद करावी. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.” – अनुप शहा (माजी विरोधी पक्ष नेते, फलटण नगरपरिषद)
- “पोलीस गुन्हेगारांना सामील असल्याचा संशय” : “शहरात जे अवैध प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, त्याची पोलिसांना पूर्ण माहिती असून पोलीसच यात सामील असल्याचा मोठा संशय आहे. फलटणला आता दोन नव्या पोलीस इमारती मिळाल्या आहेत. त्या इमारतींमधून पोलिसांनी गुंडांना अटकाव करण्याचे काम करावे.” – अमोल सस्ते (युवा नेते)
- “गुंडांची धिंड काढा” : “काल शंकर मार्केट येथे घडलेल्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारांना अटक करावी आणि त्यांची जुन्या गावठाणामधून धिंड काढावी.” – जगन्नाथ ऊर्फ भाऊसाहेब कापसे (जेष्ठ नेते)
एकाला ठोकल्या बेड्या; ‘नागरिकांना अपेक्षित तशीच कारवाई होईल’ : पो. नि. अरविंद काळे
नागरिकांच्या आणि नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी तपासाची माहिती दिली.
ते म्हणाले, “काल घडलेला प्रकार अतिशय वाईट आहे. आरोपींना अटक करण्यासाठी आमची दोन पथके तत्काळ रवाना झाली असून, एका आरोपीला आम्ही अटक केली आहे. काल रात्रीच फिर्याद घेण्यासाठी पोलीस रुग्णालयात गेले होते, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार (जखमींची प्रकृती गंभीर असल्याने) काल फिर्याद दाखल करता आली नाही. आज फिर्याद दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे. नागरिकांना जे अपेक्षित आहे, अगदी त्याच कठोर पद्धतीने या गुंडांवर कारवाई करण्यात येईल. यापुढे शहरात सायंकाळपासूनच पोलिसांची गस्त अधिक वाढवली जाईल.”

