बारामतीत पाचवी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात;

शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांच्या परीक्षा केंद्रांना भेटी

बारामती येथे शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सोबत गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी.

फलटण टुडे वृत्तसेवाच ( बारामती दि २३ फेब्रुवारी २०२६):-स्पर्धा परीक्षेचा पाया समजली जाणारी शालेय स्तरावरील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. २२) बारामती तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली. शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी तालुक्यातील पाच विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तसेच परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत त्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी उपस्थित होते.

तालुक्यातील उपस्थितीचा टक्का ९८ च्या पार…
बारामती तालुक्यात पाचवी आणि आठवी मिळून एकूण ५२३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१४३ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते, तर ९१ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण उपस्थितीचे प्रमाण ९८.२६% इतके राहिले.

सविस्तर आकडेवारीनुसार, पाचवीच्या २१ केंद्रांवर एकूण ३१८२ विद्यार्थ्यांपैकी ३११६ विद्यार्थी उपस्थित (९७.९२%) तर ६६ विद्यार्थी गैरहजर होते. आठवीच्या ११ केंद्रांवर २०५२ विद्यार्थ्यांपैकी २०२७ विद्यार्थी हजर (९८.७८%) होते, तर केवळ २५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

पंधरा दिवसांचा वाढीव वेळ ठरला फायदेशीर..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा पूर्वी ८ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती, मात्र अपरिहार्य कारणास्तव ती २२ फेब्रुवारीला घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पंधरा दिवसांचा अधिकचा कालावधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ११ ते १२:३० या वेळेत प्रथम भाषा व गणित, तर दुपारी २ ते ३:३० या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर झाला.

Screenshot

मिश्र प्रतिक्रिया आणि पालकांची गर्दी..
परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव पाहायला मिळाले. गणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आव्हानात्मक असल्याने अनेकांना वेळ अपुरा पडल्याची तक्रार होती, तर काहींनी सराव चांगला असल्याने पेपर सोपा गेल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी सकाळपासूनच पालकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती.

सहसंचालक क्षीरसागर यांनी विद्या प्रतिष्ठानमधील मराठी व इंग्रजी माध्यम शाळा, सायरस पूनावाला हायस्कूल, गजाननराव देशपांडे हायस्कूल आणि विद्या प्रतिष्ठान सीबीएसई शाळा या केंद्रांना भेटी देऊन नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!