
शंकर मार्केट हल्ल्यातील जखमी हिरणवाळे बंधूंची रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी करताना नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर ,प्रितसिंह खानविलकर ,निखिल डोंबे व इतर मान्यवर
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि २६ फेब्रुवारी २०२६):-फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या हिरणवाळे बंधूंना आज नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली. या हल्ल्यात अनिल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती विचारपूस करताना त्यांनी कुटुंबीयांशीही संवाद साधला.
यावेळी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, “फलटणचे राजघराणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. .” या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्यांनी जखमी बंधूंना धीर दिला.

हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाकडे ठोस मागणी करण्यात येईल, तसेच गुन्हेगारांना कडक शासन होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. जखमी व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शंकर मार्केट परिसरातील वाढत्या दहशतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.


