फलटण इंजिनिअरिंग कॉलेजला स्वायत्ततेचा दर्जा

फलटण टुडे वृत्तसेवा(फलटण,दि १३ एप्रिल २०२६):-

फलटण एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त संस्थेचा मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे फलटण व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आ. रामराजे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असून अत्याधुनिक सुविधा व उद्योगाभिमुख शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करण्यात येणार आहे. महाविद्यालयात नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक इमारतीत संगणक प्रयोगशाळा, हाय-स्पीड इंटरनेट, सुसज्ज सेमिनार हॉल तसेच समृद्ध ग्रंथालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित प्रशिक्षण मिळणार आहे. स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाला स्वतःचा अद्ययावत व उद्योगसुसंगत अभ्यासक्रम राबवण्याचे स्वातंत्र्य मिळणार असून उद्योग क्षेत्राशी थेट समन्वय साधता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया स्वायत्त संस्थेच्या निकषांनुसार राबवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

प्राचार्य मनोजकुमार दळवी म्हणाले, स्वायत्त दर्जा मिळणे ही संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाची कामगिरी असून यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडणार आहे. उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम रचल्यामुळे नामांकित कंपन्यांसोबत सहकार्य वाढेल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध होतील.

महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.रामराजे ना. निंबाळकर, चेअरमन रघुनाथराजे ना. निंबाळकर, सचिव संजीवराजे ना. निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन अनिकेतराजे ना. निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य दळवी, समन्वयक प्रा. शांताराम काळेल व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!