फलटण टुडे वृत्तसेवा (आसू दि ११ ) :- मी पंतप्रधान झालो तरीही माझ्यासोबत कार्यकर्ता नसेल तर त्या पंतप्रधानपदाचा काही उपयोग नाही. तालुक्याचं भलं करावं म्हणून आम्ही राजकारणात आलो होतो. तालुक्याच्या कोणत्या अडचणीत शिवरूपराजे उभे राहिले आहेत, ते त्यांनी सांगावे. आम्ही पूर्वभागाची माफी मागितली पाहिजे, कारण ह्या अशा माणसाच्या मागे आम्ही तुम्हा जनतेला उभे राहायला सांगितले होते. शिवरूपराजे यांना आम्ही घर म्हणून सर्व दिलं; मात्र, त्यांनी आम्हास परकं मानलं आहे; शिवरूपराजे सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करू असे परखड मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले आहे.
आसू (ता. फलटण) येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी आयोजित जाहीर सभेत रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, राजन फराटे, अशोक तावरे यांच्यासह आसू पंचक्रोशीतील राजे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. आसू गावातील शाळेचे ग्राउंडवर पेव्हर ब्लॉक बसविणे, बाजार समितीचा उपबाजार व जनावरे बाजार भरविणे, बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधणे अशा विविध विकासकामांचा यावेळी भूमिपूजन करण्यात आले.
श्रीमंत रामराजे यावेळी म्हणाले की, श्रीराम कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक रामचंद्र निंबाळकर यांचे निधन झाले आहे. त्याचे आम्हास दु:ख आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी आहे. आज आम्ही आसू गावातील ग्रामस्थांना खात्री देण्यासाठी येथे सर्वजण आलो आहोत. लोकसभेत जो निर्णय झाला आहे; त्यामध्ये अजितदादा पवार यांचे नाव घेतले आहे. आमचा भाजपा किंवा अजितदादा पवार यांना विरोध नाही. जे काही घडले आहे, ते मी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितले होते की, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्टेजवर जाऊ शकत नाही. मी जर महायुतीसोबत गेलो असतो तर मला सभापतीपद मिळाले असते. मी पंतप्रधान झालो तरी कार्यकर्ता माझ्यासोबत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. शिवरूपराजे यांचे व आमचे आता राजकारणात जमणार नाही. शिवरूपराजे यांना जी पदे दिली होती ती अजित पवारांनी सांगितली होती का? तुम्ही अजितदादांच्या सोबत एकनिष्ठेची शपथ घेताय, हेच हास्यास्पद आहे. तुमचं पाणी सांगोल्याला नेलं तेव्हा शिवरूपराजे कुठं होते? शिवरूपराजे हा व्यक्ती माझ्यासाठी आता अस्तित्वात राहिला नाही.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले की, रामराजे यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. दुष्काळी भागाला पाणी द्यायचे काम रामराजे यांनी केले आहे. यासोबतच बागायती पट्ट्यामध्ये मूलभूत सुविधा देण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. रामराजे यांच्या माध्यमातून ‘कमिन्स’सारखी मोठी कंपनी झाली आहे. नीरा-देवघर प्रकल्प हा रामराजे यांच्या काळातच झाला आहे. पाडेगाव ते आसूपर्यंतच्या ३६ गावांना पाणी देण्याचे काम रामराजे व संजीवराजे यांनी केले आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढविण्याचे काम रामराजे यांनी केले आहे. वेळोवेळी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम रामराजे यांच्या काळातच झाले आहे. स्वतःची प्रगती करा; स्वतःची शेती करा व विकासासाठी राजकारण करा, असे कायम रामराजे यांनी सांगितले आहे. रामराजे यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. रामराजे हे कार्यकर्त्यांचा विचार करूनच निर्णय घेत असतात. रामराजे यांच्या निर्णयासोबतच आपण राहिले पाहिजे. आपल्या गावाचा व परिसराचा विचार हा फक्त रामराजे करू शकतात, इतर कोणीही करू शकत नाही. रामराजे यांनी आसू परिसराचा सर्वांगीण विकास केला आहे व आता पुढेसुद्धा कमी पडणार नाहीत. आता मागणी केलेल्या बौद्ध समाजगृहाचे काम एका महिन्याच्या आत सुरू करू.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, आसू ग्रामस्थांचे आभार मानण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहे. आज अनेकांच्या मनात शंका, कुशंका आहेत. रामराजेंच्या कारकिर्दीत आसूमध्ये असा कार्यक्रम प्रथमच झाला आहे. लोकसभेला कार्यकर्ता मेळाव्यात ९९.९९% लोकांनी निर्णय काय घ्यायचा, हे सांगितले होते. वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एकत्रित आहे; परंतु तालुक्याच्या राजकारणात पावलोपावली माजी खासदार यांची अडचण होत होती. जो आपण लोकसभेला निर्णय घेतला, तो जर घेतला नसता तर रामराजे यांचे राजकारण अडचणीत आले असते. नेता नव्हे तर संपूर्ण गट अडचणीत आला असता. स्थानिक राजकारणाचा विचार करूनच आपल्याला निर्णय घ्यायला लागणार आहे. शिवरूपराजे यांनी गटाच्या विरोधात निर्णय घेतल्याने जे अडचणीच्या काळात गटासोबत राहिले आहेत, त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्ही शिवरूपराजे यांना कधीही वेगळे मानले नाही. अगदी बाजार समिती सभापतीपद, पंचायत समिती सभापतीपद, उपसभापतीपद व जिल्हा बँकेचे संचालक ही सर्व पदे त्यांना दिली. अडचणीच्या काळात ज्यांनी आमच्यासोबत भूमिका घेतली आता आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहे. आम्ही आसू गावाला कधीही कुठेही कमी पडणार नाही. आसू गावात दुप्पट गतीने विकास करू. सर्वसामान्य नागरिकांसाठी आता दुप्पट वेगाने काम करू. आता आसू गावात तुम्ही म्हणाल तसेच काम करू, असे आश्वासन श्रीमंत संजीवराजे यांनी ग्रामस्थांना दिले.
या जाहीर सभेस शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.