फलटण : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा.लि.ला इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग) द्वारे सर्वोत्कृष्ट डेअरी प्लांट श्रेणीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. भारत सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार नागपूर येथे भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी कंपनीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मिंदर भल्ला, दूध संकलन विभागाचे जनरल मॅनेजर डॉ.गणेश सपकळ, ब्रँड डेव्हलपमेंट विभागाचे मॅनेजर श्री.अक्षय शिंदे पुरस्कार प्रदान समारंभासाठी उपस्थित होते.
या पुरस्कारसाठी डेअरी उद्योगातील सर्वांगीण निकषांचा विचार करुन अतिशय काटेकोर पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गोकुळ दूध संघाला देण्यात आले व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस, मदर डेअरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये विभागून देण्यात आले. पुरस्कार प्राप्त दूध कंपन्यामध्ये गोविंद डेअरी ही एकमेव खाजगी संस्था आहे. यासाठी प्रामुख्याने गोविंद डेअरी शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या विविध विकास पर कामांची दखल घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने दूध व्यवसाय वृद्धिंगत करणे, महिला सक्षमीकरण, वंश सुधार योजना, मुक्त गोठा पद्धत, मुरघासासारख्या आधुनिक चारा पद्धतींचा वापर, अनुदान तत्त्वावर गोबर गॅस संच वितरण योजना इत्यादी अनेक शेतकरीभिमुख योजनांची दखल हा पुरस्कार देताना प्रामुख्याने घेण्यात आली. त्याचबरोबर गोविंद डेअरी उत्कृष्ट दर्जाचे स्वच्छ, सुरक्षित व अपायकारक घटकांच्या अंश विरहित दूध संकलन करीत असून गोविंद डेअरीचा प्लांट हा भारतातील अत्यंत अद्यावत व सुसज्ज अशा डेअरी प्लांट पैकी मानला जातो. गोविंद डेअरी मध्ये सर्व प्रकारची दूध उत्पादने तयार करताना अत्युच्च दर्जाची स्वच्छता, आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामग्री व तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा उपयोग करून ग्राहकांचे आरोग्य व हित केंद्रस्थानी ठेवून अतिशय सर्वोत्कृष्ट दर्जाची ग्राहकाभिमुख उत्पादने बनविली जातात. याचबरोबर प्रशिक्षित व कुशल कर्मचारी आणि वरिष्ठांचे अचूक मार्गदर्शन या जोरावर गोविंद डेअरी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर यशस्वी भागीदारी करीत आहे. या सर्व गोष्टींमुळे गोविंद डेअरीला हा पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन चेअरमन या नात्याने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. तसेच गोविंदच्या या यशासाठी दूध संकलन कार्यक्षेत्रामध्ये सर्वत्र या पुरस्काराचे कौतुक होत आहे. दरम्यान गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा.लि.ला मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी कंपनीचे चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी वर्ग, दूध उत्पादक शेतकरी बंधू-भगिनी, श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्था व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.