फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ) :-
जळोची येथील प्रेरित फाउंडेशनच्या वतीने विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी वारली पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखिल यप्रसंगी करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रेरित फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. मनोहर जमदाडे म्हणाले की, दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पे आहेत. तिथून पुढे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आयुष्याला दिशा मिळत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप गुणवत्ता असते. त्याच्या जोरावर विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांच्या जडण घडणीत शिक्षकांइतकीच पालकांचीही भूमिका महत्त्वाची असते. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत नेहमी सतर्क राहिले पाहिजे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे.
वारली पेंटिंग कार्यशाळेच्या मार्गदर्शिका सौ. प्रिया जमदाडे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांनी वारली पेंटिंगचा इतिहास विद्यार्थी व पालकांसमोर मांडला. तसेच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी याबाबतही मार्गदर्शन व समुपदेशन केले. विद्यार्थ्यांनी चित्रकलेप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये रंग भरून यशस्वी व्हावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी मयूर मच्छिंद्र शेंडगे (नीट परीक्षेमध्ये 649 गुण), प्रज्ञा संदीप पागळे (बारावी विज्ञान 94 टक्के गुण) व हर्षिता मनोहर जमदाडे (दहावी मध्ये 93.40% गुण) मिळवल्याबद्दल तिघांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी धनंजय जमदाडे, किरण फरांदे, विकेश होले सर, डॉ. गीतांजली शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार निखिल होले यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमासाठी विनोद जमदाडे, नितीन जमदाडे, रमेश फरांदे, संतोष पागळे, संदीप जमदाडे, संदीप कुदळे, प्रशांत जमदाडे, आप्पा जमदाडे, बाळू बनकर आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.