*मुलांचा अतिलाड काय कामाचा ?*

 

फलटण टुडे विशेष लेख :-
आपल्या आजूबाजूला अनेक वाईट घटना घडतात. त्यातील अल्पवयीन मुलांचा सहभाग पाहून मन सुन्न होते. सध्याच्या घडीला ऐरणीवर आलेला प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुले आणि त्यांचे वर्तन. 
अपघात खून,चोरी,बलात्कार,भांडणे मारामारी, अशा घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा असणारा सहभाग समाजमन हदरवून टाकणारा आहे .ज्या वयात मोठी स्वप्ने पाहायची असतात.उत्तम शिक्षण घेऊन आयुष्याला आकार द्यायचा असतो त्या वयात ही अल्पवयीन मुले वाईट सवयीच्या आहारी जाऊन स्वतः चे आयुष्य उध्वस्त करुन घेतात ही बाब खूप वेदना देणारी आहे.
खरं तर आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.पालकाचे वर्तन आणि संस्कार याचा मुलांवर प्रभाव पडतो.पालकांच्या हाती आलेला बक्कळ पैसा ,वाढता चंगळवाद ,बदलती जीवनशैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे अतिलाड यामुळे मुले कुटुंबातील संस्कार ,मूल्ये यांना पायदळी तुडवून बेफिकीरपणे वागतात.त्यातून त्यांच्या हातून चुकीच्या घटना घडतात.आणि चांगले आयुष्य मातीमोल होते.
आजच्या धावपळीच्या काळात पालकांनी सजग आणि जागरुक राहणे खूप आवश्यक आहे.तो जातो कुठे ? बसतो कुठे? करतो काय ? याकडे बारकाईने लक्ष हवं. अतिलाडापायी त्यांना जास्त मोकळीक तर देत नाही ना ? याचा मनाशी विचार व्हायला हवा. चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो मात्र वाईट सवयी पटकन लागतात.आपल्या पाल्याचे मित्र -मैत्रिणी कोण आहेत ?त्यांच्या चांगल्या किंवा वाईट सवयी कोणत्या ? त्यांचे वर्तन कसे आहे ? या सगळ्या बाबतीत जागरुक राहणं काळाची गरज बनली आहे.
समाजातील आपली प्रतिष्ठा, पत तसेच श्रीमंतीचे प्रदर्शन दाखविण्यासाठी पालक अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालवायला देतात.त्यावेळी त्यांच्या वयाचा विचार केलेला नसतो. हातात वाहन आल्यावर ही अल्पवयीन मुले उत्साहाच्या तसेच नशेच्या नादात अतिवेगाने वाहने चालवितात. आणि स्वतः बरोबर इतरांच्या जीवाशी खेळतात.खरं तर याला सर्वस्वी पालक जबाबदार आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरु नये.

 जीवन हे खूप सुंदर असून ते पुन्हा नाही.म्हणून आपल्याला मिळालेले आयुष्य चांगले जगले पाहिजे. चुकीच्या सवयी लावून आयुष्य मातीमोल करण्यात कसले आलय शहाणपण ? मान्य आहे संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे.परंतु त्याचा स्वैराचार होता कामा नये.आपल्या स्वातंत्र्यपायी दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. याचा विचार होणे गरजेचे आहे.आजकाल पैशाच्या जोरावर नियम ,कायदा पायदळी तुडविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे.याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी कायद्याची कठोर अंमलबजावणी करुन अशा वाईट प्रवृत्तींना वेळीच ठेचले पाहिजे. 
खरं तर आपल्या कुटुंबात पालकांचा आदरयुक्त दबदबा असायला हवा.आपल्या पाल्याने चुकीचे काही करताना हजारवेळा विचार करावा इतकी आपल्या संस्काराची वीण घट्ट असायला हवी.
आजची ही अल्पवयीन मुले आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात.त्यांच्यावर चांगले संस्कार करणे ही पालक म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे.घराच्या बाहेर पडल्यानंतर आपणा नितिनियमांचे पालन करणे कसे गरजेचे आहे हे मुलांना स्वतःच्या आचरणातून पटवून दिले पाहिजे.मुलांच्या चुकीच्या सवयींना वेळीच पायबंद घालणे पालक म्हणून आपले काम आहे.चुका पोटात घातल्या तर मुले लाडावतात.अशा बेफिकीरपणे वागणाऱ्या मुलांच्या हातून मोठा अनर्थ घडतो.आणि संपूर्ण कुटुंब बरबाद होते.हे होऊ नये म्हणून मुलांना चांगल्या सवयी लावा.त्यांच्यावर प्रेम करा पण अतिलाड करु नका.नाही तर एक दिवस नक्कीच पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.
लक्ष्मण जगताप 
विद्या प्रतिष्ठान ,बारामती
*लेखक चिंतनशील शिक्षक आहेत.*

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!