बारामती एमआयडीसीमध्ये कचऱ्याची समस्या दिवसोंदिवस गंभीर होत चालली आहे. यावर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असून बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने कचरा समस्येवर मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मोठ्या कंपन्या, लघुउद्योजक, कामगार, एमआयडीसी व पोलिस प्रशासन, बारामती नगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींच्या सहकार्य व सहभागाने सामूहिक प्रयत्न करून निश्चित मार्ग काढला जाईल असा विश्वास बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी व्यक्त केला. बारामती एमआयडीसी अंतर्गत क्षेत्रात कचऱ्याची ठिकाणे पहाणी दौरा आयोजित केला होता त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.
या पाहणी दौऱ्यात एमआयडीसीचे उपअभियंता विजय पेटकर, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, चंद्रकांत नलवडे, विष्णू दाभाडे, महावीर कुंभारकर, बिडाचे व्यवस्थापक माधव खांडेकर, टेक्स्टाईल पार्कचे अनिल वाघ आदी सहभागी झाले होते.
धनंजय जामदार पुढे म्हणाले अनेक लहानमोठ्या उद्योगाव्यावसायिकांकडून निकामी प्लास्टिक, रबर, लाकूड, काच, कागद, वंगण तेल, पॅकिंग मटेरियल, घातक रसायने, टाकाऊ खाद्यपदार्थ आदी स्वरूपाचा कचरा MIDC तील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बिनधास्तपणे फेकला जात आहे. याचबरोबर MIDC बाहेरील अनेक हॉटेल व इतर उद्योगव्यावसायिक, नागरिक व कामगार त्यांचा सर्व प्रकारचा कचरा MIDC क्षेत्रात टाकून जात आहेत. टाकलेल्या कचयाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा तो पेटवून दिला जातो. यातून प्रचंड धूर , अत्यंत विषारी वायु उत्सर्जित होऊन पर्यावरण व आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
बारामती एमआयडीसी संपूर्ण राज्यात अतिशय स्वच्छ,हरित व सुंदर औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते पण या कचरा समस्येमुळे आपली MIDC विद्रुप व गलीच्छ होण्यास सुरवात झाली आहे याची आपण सर्वांनी गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे.
एमआयडीसीचे उपअभियंता विजय पेटकर म्हणाले बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हाती घेतला असून उद्योजक, नगरपालिका व एमआयडीसीच्या एकत्रित प्रयत्नातून कचरा समस्येवर मार्ग काढला जाईल.