आचारसंहिता उल्लंघनाची आता थेट आयोगाकडे तक्रार मतदार, उमेदवारांच्या मदतीसाठी निवडणूक आयोगाचे ॲप, पोर्टल

फलटण टुडे वृत्तसेवा : – 
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत मतदार, उमेदवारांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे ॲप, पोर्टल सुरू केले आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांची नागरिकांना थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्याची पहिल्या १०० मिनिटांत दखल घेतली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात २० मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे, काय करू नये याविषयी निवडणूक आयोग उमेदवार व राजकीय पक्षांना माहिती देते. मात्र, काही वेळा आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते.
त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटिझन ॲप विकसित केले आहे. यावर येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही केली जात आहे. यासह एकूण १२ ॲप, पोर्टलही सुरू केले आहेत.
यातील नो युवर कँडिडेट ॲपवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर कुठला गुन्हा दाखल आहे, त्यांचे शिक्षण किती आदी माहिती नागरिकांना पाहता येणार आहे. काही ॲप नागरिकांना तर काही ॲप कर्मचाऱ्यांना वापरता येणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता उल्लंघनासह निवडणूक कामकाज सुलभ झाले आहे.
सी व्हिजिल ॲपची वैशिष्ट्ये
सी व्हिजिल ॲपवर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करता येते. त्यासाठी वापरकर्त्यांना जीपीएसचा वापर करत थेट घटनेचे चित्रीकरण करता येते. तसेच तक्रारीच्या स्थितीचा मागोवाही घेता येतो.
मतदान, मतमोजणीची स्थिती कळणार
व्होटर टर्न आउट ॲपमुळे मतदारांना मतदानादिवशी दर तासाला किती टक्के मतदान झाले, याबाबत माहिती मिळेल. निवडणूक निकालाच्या दिवशी मतदारांना त्याची मोठी उत्सुकता असते. त्या दिवशीही कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले, कोण आघाडीवर अथवा पिछाडीवर आहे, याची माहिती मिळणार आहे.
प्रलोभनांवर राहणार नजर
सीझर मॅनेजमेंट ॲपमुळे निवडणूक काळात मतदारांना देण्यात येणाऱ्या प्रलोभनांवर नजर ठेवता येणार आहे. दारू, रोकड अथवा भेटवस्तूच्या वाटपावर नियंत्रण ठेवता येईल. शिवाय तक्रार आल्यास या ॲपची प्रशासकीय यंत्रणेला मदत होणार आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबी पाहता येणार आहेत.
एकूण ९३ तक्रारी दाखल
सिव्हिजिल ॲपवर सोमवार (ता. १) पर्यंत आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या ९३ तक्रारी दाखल झाल्याची माहिती नोडल अधिकारी आशिष लोकरे यांनी दिली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!