फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती प्रतिनिधी ) :-
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील 347 अंशतः अस्थाई कर्मचाऱ्यांपैकी 321 कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात आले असून उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही या दृष्टीने योग्य मोबदला देण्यात येईल व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
बारामती एमआयडीसी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अंशतः अस्थाई कर्मचारी संघटनेच्या वतीने कृतज्ञता म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी एमआयडीसी चे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता सुधीर नागे,
कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, उप अभियंता विजय पेटकर व कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बाळासाहेब जगताप व संजय चौधर, कुंडलिक मुटेकर, माणिक लाधे, तानाजी शिंदे, संतोष कोठावळे, संदीप उगेमुगे,संजय कांबळे,दत्ता कोकरे, अशोक दिवेकर, पोपट जगताप आदी मान्यवर उपस्तीत होते.
कर्मचाऱ्यां च्या हितासाठी निर्णय घेत असताना, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, स्थायी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रदेशात शिक्षण घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे निर्णय लागू करण्यात आले आहेत व यावर्षी 397 टॅब पाल्यांना शिक्षणासाठी मोफत देण्यात येणार आहे, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एकत्रित काम करून उद्योजकांना उत्तम सेवा द्या असेही उदय सामंत यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी आंदोलने, उपोषण, विष प्राशन करणे व न्यायालयीन लढा दिला परंतु उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य मंत्री मंडळाने योग्य निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना न्याय भेटल्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांनी सांगितले.
या वेळी कर्मचारी,संघटना व कुटूंबियाच्या वतीने सामंत यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार पोपटराव जगताप यांनी मानले.