फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 26 ): –
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक-2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारी बाबतचा आढावा अपर मुख्यसचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत देशपांडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपायुक्त निलीमा धायगुडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, पर्यवेक्षाधिन आयएएस अधिकारी श्री. चंद्रा यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची व्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्था, मतदार नोंदणी, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, दाखल गुन्हे, इ. बाबत सविस्तर सादरीकरण करणेत आले. या सादरीकरणाच्या वेळी अपर सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सातारा जिल्हयातील निवडणूक पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्था बाबत समग्र व वस्तुस्थितीजन्य आढावा घेत ज्या बाबी निर्देशनास आल्या त्या मुद्यांवर जाणीवपूर्वक लक्ष देवून कार्यवाही करणे आवश्यक आहे या बाबत निर्देश व मार्गदर्शन केले.
• *अंतिम मतदार यादी* :-
दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात व सातारा जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि सातारा जिल्हयातील मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत *ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत 25,70,343 मतदारांमध्ये 108754 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच 1,32,634 मतदारांची वगळणी करण्यात आली*. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारांची संख्या 25,46,463 इतकी झालेली आहे. त्यानुसार पुरुष मतदारांची संख्या 12,97,027 व श्री मतदारांची संख्या 12,49,345 आणि 91 तृतीयपंथी मतदारांची संख्या नोंदविणेत आलेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील श्री-पुरुष गुणोत्तर 957 वरून 963 इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये 3392 मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ या वयोगटात 36984 मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या 9205 (0.26 टक्के) होती.ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत 43,127 (1.64 टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या 403004 (11.20 टक्के) होती, ती अंतिम यादीत 4,39,988 (16.72 टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरिक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार 1,07,112 मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांपैकी ऐंशीपेक्षा अधिक वय असलेले 38,321 मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये 23,927 एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत 8767 मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज DSE) 10353 मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून 3537 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे. मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. सातारा, जावली, कोरेगाव वाई, महाबळेश्वर, खंडाळा, फलटण, खटाव, कराड व पाटण या तालुक्यांमध्ये ही शिबिरे घेण्यात आली होती.
त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण 793 लोकांना मतदार ओळखपत्र, 1127 लोकांना जातीचे दाखले, 116 कुटुंबांना रेशनकार्ड, 123 लोकांचे आधार कार्ड यांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील लोकांची व्यग्र जीवनशैली, मतदानाबद्दल अनास्था यामुळे मोठ्या शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असते. शहरी मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करणेत येत आहे. यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुले आणि १ ऑक्टोबर या बहु- अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली, पूर्वनोंदणीचे एकूण 17550 अर्ज ( १ एप्रिल-4834.1 जुलै-6104 व 1 ऑक्टोबर -6612) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updataion) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे. दिनांक २३ जानेवारी रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच आठ मतदार नोंदणी विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाच्या ठिकाणी व तालुक्याच्या ठिकाणी व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन अपर सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य श्रीकांत देशपांडे यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि ‘वोटर हेल्पलाइन अॅप यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
* *मतदान ओळखपत्रः*-
पोस्ट विभागाव्दारे वितरित करण्यात आलेल्या निवडणूक ओळखपत्रांचे परत येण्याचे प्रमाण कमी आहे. मतदार नोंदणी करतेवेळी मतदारांनी अचुक पत्ता न नोंदविल्याने निवडणूक ओळखपत्र वितरणात काहीवेळा अडचणी येत आहे. पोस्ट विभागाकडून परत आलेल्या ओळखपत्रांचे बिएल ओ व्दारे वितरण करणेत येत आहे. आज अखेर एकूण 54735 मतदार ओळखपत्रांचे वाटप केलेले आहे.
• *नोडल अधिकारी व इतर अधिकारी यांच्या नेमणुका व प्रशिक्षण*:-
जिल्हास्तरावर 16 नोडल अधिकारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे. तसेच क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी यांच्या नेमणुका करणेत आलेल्या आहेत. जिल्हयात एकूण 43 स्थायी निगराणी पथक (SST) व 49 भरारी निगराणी पथकांची (FST) नेमणुकीचे कामकाज पूर्ण करणेत आलेले आहे. या सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे.
• *मतदान केंद्र व आवश्यक सोयी सुविधा* :-
सातारा लोकसभा मतदार संघात एकूण 3019 केंद्रे असून 6 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. सातारा विधानसभा मतदार संघातील मोजे रवंदी ता. जावली येथील 1 केंद्र मतदार नसलेमुळे रह केलेले आहे. सदर मतदान केंद्रावरील आवश्यक सोयी सुविधा (AMF/EMF) संबंधीत यंत्रणेकडून तयार करण्याचे काम सुरु आहे. एकाच इमारतीत 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी व संबंधीत पोलिस अधिकारी यांनी संयुक्त पणे भेटी देवून सदर मतदान केंद्रावर 10,20,30 किंवा अधिक वाहनांकरीता वाहनतळ व्यवस्था (Parking) करणे बाबत पाहणी करणेत आलेली आहे.
• *क्रिटीकल पोलिंग स्टेशन*:–
क्रिटीकल पोलिंग स्टेशनची निवड करणेत आलेली असून जिल्हयामध्ये मागील मतदान टक्केवारीनुसार 7 पोलिंग स्टेशन क्रिटीकल आहेत. व पोलिस विभागच्या मुल्यांकनानुसार 21 पोलिंग स्टेशन क्रिटीकल आहेत.
• *महिला अधिकारी कर्मचारीव्दारा संचलित एकूण 16 मतदान केंद्र, दिव्यांगव्दारा संचलीत एकूण 8 मतदान केंद्र आणि तरुण संचलित मतदान केंद्र एकूण 16 आहेत सदर मतदान केद्रांची विधानसभा निहाय निश्चिती करणेत आलेली आहे*.
◆ *Vulnerability Maping*:-
महसूल क्षेत्रिय अधिकारी व पोलिस क्षेत्रिय अधिकारी यांनी संयुक्त पहाणी करुन जिल्हयामध्ये Vulnerability भाग नसलेचे अहवाल देणेत आलेले आहेत.
* *वेब कास्टिंग*:-
विधानसभा मतदार संघ निहाय मतदान केद्रांच्या किमान 50 टक्के एकूण 1510 मतदान केंद्रवर वेव कास्टिंग करणेत येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने Vulnerable व Critical गर्दी होणारे, झोपडपट्टी एरिया, सायंकाळी उशिरा पर्यंत मतदान सुरु असलेल्या पूर्व इतिहास असलेले मतदान केंद्र, उमेदवारांचे नांव ज्या मतदान केंद्रावर नोंदविलेले आहे ती मतदान केंद्रे, पोलिसांनी सुचविलेली मतदान केंद्रे व उमेदवारांनी सुचविलेली मतदान केंद्रे यांचा समावेश करणेत येणार आहे.
*Network Shadow Zone*:-
नेटवर्क नसलेल्या एकूण 31 मतदान केंद्राकरीता Communication Plan तयार करणेत आलेला असून संदेश वाहनाकरीता पोलिस विभाग किंवा वनविभागाचे VHF-Walky Talky/संदेश वाहक कोतवाल, पोलिस पाटील स्वस्त धान्य दुकानदार, ग्रामपंचायत शिपाई/ ड्रोन यांची मदत घेणेत येणार आहे.
* *मनुष्य बळ* :-
जिल्हयामध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. मतदान पथकाच्या यादृच्छीकरणासाठी (Randomization) मतदान केंद्राची अचुक वर्गकारी संगणक प्रणालीमध्ये नोंद करणेत आलेली आहे. महिला अधिकारी कर्मचारीव्दारा संचलित मतदान केंद्र, दिव्यांगव्दारा संचलीत मतदान केंद्र आणि तरुण संचलित मतदान केंद्र या प्रकारची वर्गवारी Manpower Database Software मध्ये चिन्हांकीत करणेत आलेली आहेत.
• *ईव्हीएम व व्हिव्हीपॅट प्रचार व प्रसिध्दी बाबतः*-
मतदार जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम सातारा जिल्हयातील आठही विधानसभा मतदार संघात 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविणेत येत आहे. आज अखेर मतदार संघातंर्गत असणाऱ्या एकूण 2123 ठिकाणांपैकी 2000 ठिकाणांवर प्रचार झालेला आहे.
• *जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा (District Election Management Plan)*:–
आठही विधानसभा मतदार संघ निहाय जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा तयार करणेत आलेला आहे.