फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
“सायबु दादा “ माझे आजोबा कंबरेत वाकुन एक एक दगडानं शेताची ताल रचत होते . मी वरच्या तुकड्यातनं लहान लहान धोंडे गोळा करून रचलेल्या तालीच्या ठोकाळ दगडाच्या सांधीत कोंबत होतो . खालच्या बाजुनं मोठा भाऊ जरा मोठ-मोठ्याली अनं निमुळती दगडं दादांना पुरवायचा .
आमची माळरानाची जमीन सात आठ महिने पाणी पिऊन ठम फुगायची . मात्र उन्हाळ्यात चारपाच महिने पाण्यावाचुन हाडकुन जायची . याच गरमीच्या दिवसात आम्ही “हंगामी बिनकामाची माणसं “काही काम नाही म्हणुन शेताच्या बांधा बांधाने उगीच राबायचो बांधबंदिस्त करायचो. कुंटुंबाचं अस्पष्ट व अर्थहीन भविष्य बळकट करण्यासाठी घाम गाळायचो . असं चित्र माझ्या डोळ्यात आजपण एकदम स्पष्ट रेंगाळतेय .
एखाद्या पोक्त माणसाला किती लहानग्या वयातलं आठवायला पाहिजेत हा संशोधनाचा भाग असेल , मी त्यावेळी पाचवीतनं सहावीत जाणार होतो , घरी आलेल्या पाहुण्याचा डोळा चुकवुन त्यांची सायकल घडीभर हडपायला मी शातीर होतो . सायकलच्या साठ्यातनं नळीला धरून आर्धा “पांयडल” मारायला मी गप्पचुप शिकलो होतो . वस्तीवरच्या सोबत हुंदडायला असणाऱ्या पोरांकडे जिंकल्याच्या अविर्भावात बघतबघत एकदम ऐटीत सायकल पिटळायचो असं ते माझं धडपणारं वय.
कुठल्याच हात्याराविना दादांचं गंवड्यागत एका दोरीत ताल रचायचं काम मन लावुन चाललं होतं . दुध वहायच्या किटलिला पोत्याचं किलतान बांधुन त्यांनी प्यायचं पाणी थंड रहावं म्हणुन क्लुप्ती केलेली , त्या जुगाडबाज फ्रीज वजा “जरमनच्या किटलीला” मी त्यांच्या पुढ्यात नेहुन ठेवली.
अंगातल्या धोतराने मातीत लोळलेल्या ग्लासाची बारीक पिवळी धुळ पुसुन त्यांनी किटलीचं नरडं धरून तिला आडवी वाकवली व पाण्याचा ग्लास गच्च भरला . हवेतुनच ओठांच्या गाभाऱ्यात पाण्याचा पहिला घोट घशात उरवला , तोंडातल्या तोंडात खुळखुळ-खुळ असा आवाज काढुन उलट्या दिशेला लांब पिचकारी हानली अनं अचानक “अरं ऐ आबा यमाईची लोकं आली वाटतं बग …..!” अशी लेकाच्या नावानं आर्त आरोळी ठोकली .
लांब खडीच्या रस्त्यावर दोन पांढऱ्या शासकीय चारचाकी गाड्या आम्ही पाहिल्या. सगळेजण त्या दिशेने पहात राहिलो तोवर आमचा आजोबा धोतराचा सोगा धरून कासराभर चालता झाला . त्यांच्या मागं आम्ही भाऊ-भाऊ आणवाणी पायांनी धावलो . यमाईच्या लोकांच्या हातातली कागदं अडाणी नजरेनं दादा हेरत होतं . मी पण त्या दहा-बारा माणसांच्या गर्दीत मांजरासारखी लुडबुड करायला लागलो .
तेवढ्या वर्षेभरात पाच-सात वेळा तर नक्कीच यमाईच्या लोकांनी आमच्या रानात पुर्वपरवानगीनं हजेरी लावली असेल , हे सर्व मी कुतुहलाने न्याहळायचो . मला जिल्हा परिषदेच्या शाळेनं पोसल्यामुळं लय उभं -आडवं कळत नव्हतं . दादानं ठोकलेली “यमाईची माणसं “ ही आरोळी आजपण कानात जिवंत आहे .
त्यांच्या अज्ञानी यमाई या शब्दउच्चाराचा अर्थ एम आय डी सी (MIDC) होतो हे मला कळायला चार वर्षे गेली . तोपर्यंत अलगद जपलेल्या सात-बारा वरचं आजोबांचं नाव कमी होऊन त्यावर महाराष्ट्र राज्य उर्जा व कामगार विभाग असं नाव लागलेलं व त्याचं कवडीमोल फळ मोबदला रूपाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या खाते क्र ९८८३ मध्ये जमा झाले होते .
त्यांच्या बलिदानावर आज अनेकांची भवितव्य घडली आणि हे परिवर्तन दादांनी प्रमाणिकपणे स्विकारलं , हातचं काही तरी निसटलं अनं थोडफार विस्कटलं म्हणुन कधीच सोडुन दयायचं नाही .ही त्या अशिक्षीत माणसांने समाजाला दिलेली शिकवण आहे …ज्याच्या बळावर पुन्हा कंबर कसुन त्यांनी आपला प्रपंच तेवढ्याच नेटाने उभा केला.
या सर्व घटनेला मी मात्र कच्चंलिंबु या नात्याने गुमान साक्षीदार होतो . आजची “बारामतीची यमाई “आमच्या आडाणी आजोबांच्या तडजोडीच्या पुण्याईनं दिवसेंदिवस बहरतेय , इथल्या मातीला चार गावच्या पुर्वजांच्या घामाचा वास येतो , तो कष्टाचा वास हुंगायला आपल्या आताच्या पिढीच्या संवेदनशील नाकपुड्या मात्र कायम उघड्या असाव्यात .
शब्दांकन: ऍड हरीश कुंभरकर