साहित्य व संस्कृती वाढीस लागून पर्यावरण संवर्धन व संरक्षण जागृती निर्माण करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण यांचे वतीने एक दिवसीय राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलन 2024 चे आयोजन नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते प्राचार्य रविंद्र येवले यांची संमेलन अध्यक्षपदी तर कृषीतज्ञ सुगम शहा यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अशी माहिती माणदेशी साहित्यिक व संयोजक ताराचंद्र आवळे यांनी दिली आहे. या आगळ्यावेगळ्या राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलनाचे उद्घाटन अदिती भारद्वाज उपवनसंरक्षक वनविभाग सातारा व हरिश्चंद्र वाघमोडे विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण सातारा यांचे हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन रघतवान वन परिक्षेत्र अधिकारी फलटण, दिगंबर जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण, अरविंद मेहता ज्येष्ठ पत्रकार, प्रदीप कांबळे ज्येष्ठ कवी यांची उपस्थिती राहणार आहे. दुसर्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून मानव व वन्यजीव संघर्ष याविषयी ग्लोबल अर्थ फाऊंडेशनचे सचिन जाधव व मंगेश कर्वे यांचे ,मानव व पर्यावरण सहसंबंध याविषयी नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांचे तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याविषयी प्रा.सौ पूनम मोरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तिसर्या सत्रात साताऱ्याचे ज्येष्ठ साहित्यिक आनंदा ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव, ज्येष्ठ साहित्यिक महादेवराव गुंजवटे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय माणगंगा साहित्य गौरव पुरस्कार वितरण व समारोप कार्यक्रम होणार आहे.तरी जास्तीत जास्त साहित्यिक, साहित्य रसिक,साहित्य प्रेमी व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी संयोजन समितीच्या वतीने केले आहे.