फलटण टुडे ( सातारा दि. 13 ): –
ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत, त्या महाविद्यालयांनी सदर अर्ज महाविद्यालयस्तरावर न ठेवता सहायक आयुक्त, समाजकल्याण, साताराकार्यालयास 18 फेब्रुवारीपर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/ शिक्षण फी परिक्षा फी, राजर्षी छ. शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु. जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. ११/१०/२०२३ पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय/ महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी.
तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ मधील शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत. तसेच सदरचे अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत.