फलटण टुडे (मुंबई, ) :-
मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात आज खो खो स्पर्धा (मुंबई उपनगर) बांद्रा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे सुरु आहेत. आज झालेल्या सामन्यांमध्ये १४ वर्षाखालील गटाच्या मुलांची स्पर्धा पार पडली. या गटात मुंबई उपनगरच्या तब्बल २६ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
खो-खो
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामना महात्मा गांधी विद्यामंदिर वि. सिद्धार्थनगर मनपा स्कूल यांच्यात पार पडला. हा सामना महात्मा गांधीने १४-७ असा एक डाव ७ गुणांनी जिंकला. या सामन्यात महात्मा गांधीच्या आर्यन चव्हाणने ६.२० मि. संरक्षण करीत ०५ गडी बाद करताना अष्टपैलू खेळाची चमक दाखवली. अक्षय राठोड, तन्मय पुजारे व आर्यन गावडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले करत संघाला स्पर्धेत विजेता होण्यात मोलाची भूमिका बजावली. तर सिद्धार्थ नगर मनपा कडून खेळताना सचिन सहानीने १.३० मि, संरक्षण करत ३ गडी बाद केले व एक जिगरबाज खेळी पेश केली मात्र तो संघाचा मोठा पराभव टाळू शकला नाही.
दोरी उड्या
अंधेरी येथे पार पडलेल्या दोरी उड्या खेळात ३०० पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. ३० सेकंदात सर्वाधिक दोरी उड्या मारणाऱ्या खेळाडूला विजयी घोषित केले जाते. १२ वर्षाखालील मुलांच्या गटात यश सिंगने ११६ दोरी उड्या तर मुलींच्या गटात दृष्टी दाबनी ११५ दोरी उड्या, १४ वर्षाखालील मुलांच्या गटात तरुण धनगर ११६ दोरी उड्या तर मुलींच्या गटात सोनाक्षी रॉय ११२ दोरी उड्या व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अनुशकुमार नाई तर मुलींच्या गटात राखी कामत व खुल्या गटात प्रशांत गौंदर ९९ दोरी उड्या तर मुलींच्या गटात मधुरा पाटणकर ९० दोरी उड्या मारत आपआपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला.
लेझीम
कुर्ला विभागात पार पडलेल्या लेझीम स्पर्धेत २२ संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात बन्सीधर अग्रवाल सरस्वती विद्यालय चेंबूर तर खुल्या मुलींच्या गटात नॅशनल सर्वोदय हायस्कूल चेंबूरने प्रथम क्रमांक पटकावला.
दंड बैठक
अंधेरी येथे पार पडलेल्या दंड बैठक स्पर्धेत जवळजवळ दीडशे खेळाडूंनी भाग घेतला होता.
उद्या रविवारी मुंबई शहरात शिवाजी पार्क येथे खो-खो स्पर्धेला प्रारंभ होत आहे तर शारिरी सौष्ठव स्पर्धा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत असून स्पर्धेत २०० पेक्षा अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. यात नामवंत खेळाडूंनी सुध्दा भाग घेतला आहे.