फलटण टुडे वृत्तसेवा : –
राज्यातील शिक्षक भरतीस पात्र अभियोग्यताधारकांपैकी जवळपास एक लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविला आहे. शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम देण्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
दरम्यान, शिक्षक भरतीचे पोर्टल गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने बंद पडत असल्याची अभियोग्यताधारकांची तक्रार आहे. त्यावर, एकावेळीस जवळपास ७५ हजारांहून अधिक वापरकर्ते लॉगिन करत असल्याने पवित्र पोर्टल काही प्रमाणात संथ होत असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील बहुप्रतीक्षेत असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेनुसार मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
त्यासाठी पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी यापूर्वी गुरूवारपर्यंतची मुदत दिली होती. परंतु आता या मुदतीत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
शिक्षक भरतीच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविताना अनेक पात्र उमेदवारांचा गोंधळ उडत आहे. तसेच भरती प्रक्रियेचे संबंधित संकेतस्थळ वारंवार बंद पडत आहे. त्याचा फटका अभियोग्यताधारकांना बसत असून पसंतीक्रम नोंदवून अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत.
अनेकदा अर्ज भरताना मध्येच संकेतस्थळ बंद पडणे, सर्व्हर हॅग होणे, अशा समस्यांचा सामना पात्र अभियोग्यताधारकांना करावा लागत आहे. त्यामुळे पसंतीक्रम देण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पात्र अभियोग्यताधारकांकडून होत होती.
‘‘दोन लाख १७ हजार अभियोग्यताधारकांपैकी जवळपास एक लाख १८ हजार अभियोग्यताधारकांनी गेल्या दोन दिवसांत पोर्टलवर पसंतीक्रम नमूद केला आहे. सर्व पात्र अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा, याकरिता पसंतीक्रम देण्याची मुदत १२ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात येत आहे. पसंतीक्रम देण्याचे काम पूर्ण झालेल्या अभियोग्यताधारकांना त्यांचे पसंतीक्रम लॉक करण्याची सुविधा शुक्रवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येईल.’’
चौकट
– सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त
‘‘शिक्षक भरतीच्या पोर्टलवर पसंतीक्रम देताना पात्र अभियोग्यताधारक गोंधळून जात आहेत. त्यामुळे प्रशासनाने शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात मदत केंद्र सुरू करावे’’