फलटण टुडे (मुंबई ) :-
मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात आज विटी दांडू व दोरी उड्या खेळ जोरदार रंगले. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी विभागात झालेल्या विटी दांडू खेळात १७ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात अंधेरी इंग्रजी माध्यमिक शाळेने अंधेरी मराठी मनापा शाळेचा १५-१५ अशा बरोबरी नंतर नाणेफेकीवर बाजी मारली. अतिशय चुरशीच्या सामन्यात दोन्ही शाळेच्या मुलांनी कडवी झुंज देत बरोबरी साधली. शेवटी पंचांनी नाणेफेक करून अंतिम विजेता घोषित केला. या सामन्यात अंधेरी इंग्रजी शाळेच्या कार्तिक नलगे, विशाल राठोड यांनी जोरदार खेळ केला. तर त्यांना टक्कर देत अंधेरी मराठी मनापा शाळेच्या तरुण यादवने धडाकेबाज खेळ केला मात्र त्याला नाणेफेकीवर मिळालेल्या विजयात काहीही करता आले नाही.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात न्यू. वर्सोवा हिंदी शाळेने अंधेरी मनापा माध्यमिक (टाटा कम्पाउंड) शाळेचा १०-१५ असा ५ गुणांनी धुव्वा उडवला. तर मुलींच्या गटात एच. एस. बी. टी. हिंदी शाळेचा संघ अंतिम विजेता ठरला.
दोरी उड्या
दोरी उड्या खेळात ग्रँट रोड येथे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ३० सेकंदात सर्वाधिक दोरी उड्या मारणाऱ्या खेळाडूला प्रत्येक गटात विजयी घोषित करण्यात आले. हि स्पर्धा १२, १४ व १७ वर्षाखालील गटांसाठी आयोजित केली होती. या विभागात आज ३०6 मुला मुलींनी भाग नोंदवून एक विक्रमच केला.
या स्पर्धेत १२ वर्षाखालील मुलींच्या गटात आरती अरोराने ८६ दोरी उड्या मारत अव्वल क्रमांक मिळवला तर नैना राठोडने ८५ दोरी उड्या मारत जोरदार टक्कर देत दुसरा क्रमांक मिळवला तर अस्मी देवरुखकरने तिसरा क्रमांक पटकावला तर मुलांच्या गटात शिवशंकर चौरासियाने ९९ दोरी उड्या मारत प्रथम क्रमांक मिळवला, आयान रौतने ९७ दोरी उड्या मारत दुसरा क्रमांक मिळवला व मो. हरीश शेख ९० दोरी उड्या मारत तिसरा क्रमांक मिळवला.
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात लक्ष्मी चौधरी (१०५), शीतल पाल (१०१) व रिद्धी दळवी (९५) यांनी तर मुलांच्या गटात विक्रम चव्हाण (११९), अशीष चव्हाण (११६) व अवधूत साळुंखे (११०) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात परवीन आलम (९०), आफ्रिदा शेख (८४) व हबीबा अन्सारी (८२) तर मुलांच्या गटात बिट्टू यादव (१११), युवराज जगदिया (९८) व अब्राहीम काझी (८९) अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.