सनी तांबे, श्रीकांत वल्लकाठी व प्रसाद भाटकर यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
फलटण टुडे (मुंबई ३० जाने. (क्री. प्र,) : –
दादरच्या अमरवाडी गोखले रोड येथील मैदानावर सुरू असलेल्या व अमर हिंद मंडळाने आयोजित केलेल्या डायनॅमिक खो-खो लीग स्पर्धेत आज झालेले तिन्ही सामने पुन्हा एकदा ड्रीम रन्समुळे अतिशय चुरशीचे व अटीतटीचे झाले. वरळी फिनिशर्स व माहीम वॉरियर्सने सलग तीन-तीन सामने जिंकत ९-९ गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर परेल रुद्रास ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. माटुंगा फायटर्स, लालबाग स्पार्टन्स व दादर पँथर्स बरोबारीत झालेल्या सामन्यांचे १-१ गुण मिळवत गुतालीकेत तळाला आहेत. आजच्या पहिल्या सामन्यात वरळी फिनिशर्सने परेल रुद्रासचा १६ गुणांनी धुव्वा उडवला, दुसऱ्या सामन्यात दादर पॅंथर्सने लालबाग स्पार्ट्सनला बरोबरीत रोखले तर माहीम वॉरियर्सने पुन्हा एकदा चुरशीच्या सामन्यात माटुंगा फायटर्सवर ४ गुणांनी मात केली. या सामन्यांमध्ये अनुक्रमे सनी तांबे (वरळी फिनिशर्स), श्रीकांत वल्लकाठी (लालबाग स्पार्टन्स) व प्रसाद भाटकर (माटुंगा फायटर्स) यांना अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आजच्या पहिल्या सामन्यात वरळी फिनिशर्सने परेल रुद्रासचा २८-१२ असा १६ गुणांनी धुव्वा उडवला. या सामन्यात सुरवातीपासूनच वरळी फिनिशर्सने वर्चस्व राखत हा सामना आरामात जिंकला. वरळी फिनिशर्सच्या वेदांत देसाई व शुभम शिंदे (प्रत्येकी २.२० मि. संरक्षण व २ गुण), विनय परीट (२ मि. संरक्षण व २ गुण), सनी तांबे (१.५० मि. संरक्षण व २ गुण), अजय मित्रा (१.२० मि. संरक्षण व ३ गुण) व आदेश पडावे (१.३०,१ मि. संरक्षण) यांनी तर परेल रुद्रासच्या पियुष घोलम (२.२० मि. संरक्षण व १ गुण), करण गारोळे २.३० मि. संरक्षण) व सुरज खाके (१.३५ मि. संरक्षण व २ गुण) यांची कामगिरी चांगली झाली. या सामन्यात वरळी फिनिशर्सने तब्बल ११ ड्रीम रन्स मिळवले तर परेल रुद्रासने ५ ड्रीम रन्स मिळवले.
दुसऱ्या सामन्यात दादर पॅंथर्सने लालबाग स्पार्ट्सनला बरोबरीत रोखले. दादर पॅंथर्स व लालबाग स्पार्टन्समध्ये झालेला हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. सुरुवातीच्या डावात दादर पॅंथर्स विरुद्ध ७-४ अशी ३ गुणांची आघाडी मिळविलेल्या लालबाग स्पार्टन्सला दादर पॅंथर्सने १९-१९ अशा बरोबरीत रोखले. दादर पॅंथर्सकडून चैतन्य धुळपने (२.१० व ३ मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी केली तर प्रतीक घाणेकरने (१.३० मि. नाबाद व १.३० संरक्षण व १ गुण), सिद्धार्थ कोळी (१.४० मि. संरक्षण) यांनी कडवी लढत देत सामना बरोबरीत रोखला. तर लालबाग स्पार्टन्सच्या श्रीकांत वल्लाकट्टी (१.४५, २.०५ मि. संरक्षण व १ गुण), आत्माराम पालव (२.१० मि. संरक्षण), श्रेयस राऊळ (४ गुण) व तन्मय पवार (३ गुण) यांनी या सामन्यात जोरदार कामगिरीची नेब्द केली. या सामन्यात दादर पॅंथर्सने तब्बल १० ड्रीम रन्स मिळवले तर परेल रुद्रासने ८ ड्रीम रन्स मिळवत जोरदार खेळी केली.
शेवटच्या व तिसऱ्या सामन्यात माहीम वॉरियर्सने पुन्हा एकदा चुरशीच्या सामन्यात माटुंगा फायटर्सवर २०-१६ (मध्यंतर ११-९) अशी ४ गुणांनी मात केली. या सामन्यात माहीम वॉरियर्सच्या जनार्दन सावंत (२, १.३० मि. संरक्षण), आयुष गुरव (१.३५,१.३५ मि. संरक्षण व १ गुण), ओमकार मिरगळ (१.३० मि. संरक्षण व १ गुण), सिद्विक भगत (१.१० मि. संरक्षण) ओम भरणकर व रोहन टेमकर (प्रत्येकी ४-४ गुण) सतीश गुळंबे (३ गुण) यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय सुकर करत उपांत्य फेरीत धडक मारली. तर माटुंगा फायटर्सच्या प्रसाद भटकर (२, १४० मि. संरक्षण व १ गुण), वरून पाटील (१.१०, १.४० मि. संरक्षण व २ गुण), शुभम कांबळे (१.५० मि. संरक्षण) व प्रशिक मोरे (४ गुण) यांनी दिलेली कडवी लढत वाया गेली. या सामन्यात माहीम वॉरियर्सने ७ ड्रीम रन्स मिळवले तर माटुंगा फायटर्सने ४ ड्रीम रन्स मिळवले.